आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे | पुढारी

आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
खासदार हेमंत गोडसे यांनी विकासकामात खोडा घालून श्रेय लाटण्याचे काम करू नये. अन्यथा तुम्हाला पुन्हा लोकसभा लढवायची आहे, मग गाठ माझ्याशी आहे, असा खणखणीत इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी खासदार गोडसे यांना दिला.

पिंपळगाव मोर – वासाळी फाटा रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. आमदार – खासदार यांच्यात भूमिपूजनाचा श्रेयवाद धामणी ते बोरीची वाडी रस्त्यानंतर शनिवारी (दि. 19) बघायला मिळाला. व्यासपीठावर माजी जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे, ज्येष्ठ नेते रतन पा. जाधव, रायूकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, पं. स. माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पिंपळगाव मोर सोसायटीचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ काळे, सरपंच हिराबाई गातवे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत गाढवे, धामणी सरपंच नारायण भोसले, भरवीर सरपंच अरुण घोरपडे आदी उपस्थित होते. राज्य शासनाचा निधी आणि केंद्र सरकारचा निधी यातला फरक खासदारांनी समजून घ्यावा. मागच्या पाच वर्षांत सत्तेत असताना तुमचे चालत होते, तर रस्ता तेव्हा का नाही मंजूर केला? तुम्ही खरंच कर्तृत्ववान होते, तर सत्तेत असतानाच रस्ता का मंजूर केला नाही. केवळ चार दोन कार्यकर्ते हाताशी धरून जनतेची दिशाभूल करणे खासदारांनी सोडावे असे खडेबोल आमदार कोकटेंनी खासदार गोडसेंना सुनावले. राज्य सरकारच्या बजेटमधील कामांचे नारळ आमदारांनी फोडावे, केंद्राच्या बजेटची नारळ खासदारांनी फोडावे. ज्याला कायदा कळत नाही तो लोकप्रतिनिधी कसा काय ? हा माणूस खासदार झाला कसा काय ? हा निव्वळ बालीशपणा असल्याचे आमदार कोकाटे म्हणाले. प्रस्तावित पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा रस्ता सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण असताना मंजूर झाला आहे, तरीही या रस्त्याचे श्रेय कसे काय खासदार लाटू शकतात असे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी भगवान जुंद्रे, युवती तालुकाअध्यक्ष रुक्मिणी जोशी, गटनेते वसंत भोसले, माजी सरपंच गौतम भोसले, टाकेद सरपंच रतन बांबळे, दौलत बांबळे, श्रीराम लहामटे, संतोष वारुंगसे, दशरथ भोसले, ईश्वर भोसले आदींसह परिसरातील पदाधिकारी व समर्थक उपस्थित होते.

‘एकाच व्यासपीठावर या, मग कामे मंजुरीचे बोलू’
तुमची इच्छा असेल, तर एकाच व्यासपीठावर येऊन विकासकामांच्या मंजुरीचे बोलू. रस्त्याचे काम कोणी आणले, कोणी पाठपुरावा केला, याबद्दल जनतेला कळू द्या, असे आव्हान आमदार कोकाटे यांनी खासदार गोडसे यांना दिले. आगामी वर्षभरात उच्च गुणवत्तेचा रस्ता होणार असून, विकासकामांत आडवे येणार्‍यांची मी पर्वा करीत नाही. आडवे येणार्‍यांना कसे आडवे करायचे हे मला चांगलेच माहीत आहे, हे खास शैलीत आमदार कोकाटे यांनी सांगितले.

राघोजी भांगरे स्मारक कामातही खोडा
इगतपुरी तालुक्यातील प्रस्तावित राघोजी भांगरे स्मारक वासाळी येथे होणार असून गेल्या वर्षी स्मारकाचे भूमिपूजनदेखील झालेले आहे. खासदारांनी वासाळी ऐवजी सोनोशी जागेचे नव्याने पत्र देऊन कामात खोडा घालण्याचे काम केले, त्यामुळे स्मारकाचे काम एक-सव्वा वर्ष रखडले आहे. सोनोशीला जमीन उपलब्ध नसून शिल्लक जागा वनविभागाची असून खासदारांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी फेटाळून लावला असून राघोजी भांगरे यांचे एकच स्मारक वासाळी फाटा येथेच होणार असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button