विकास, मैत्री अन् कौतुकाचे उड्डाण! | पुढारी

विकास, मैत्री अन् कौतुकाचे उड्डाण!

संदीप रोडे :

कधी होणार, कसा होणार, होणार की नाही… अशा नगरकरांच्या शंका-कुशंकाचे उत्तर शनिवारी मिळाले. विकासाचे व्हिजन असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नगरच्या पहिल्यावहिल्या उड्डाणपुलाचा लोकर्पण सोहळा झाला अन् नगरकरांची स्वप्नपूर्ती एकदाची झाली. या सोहळ्यात विकासाचा मार्ग नगरकरांना दाखवित भविष्यातील ‘लॉजिस्टीक नगर’ची हाक गडकरींनी दिली. नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप-भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मैत्री धाग्याची वीण याच सोहळ्यात उपस्थित नगरकरांच्या साक्षीने घट्ट झाली. स्व. दिलीप गांधी, खा. विखे यांचे कौतुकही गडकरींनी केले. लक्षवेधी विखे-जगतापांच्या मैत्रीने मुंबईच्या दिशेने डोळे लावू पाहणार्‍या भाजपातील ‘भावीं’ची घालमेल झाल्याचेही याच सोहळ्यात दिसले.

गत लोकसभेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढणारे डॉ. सुजय विखे पाटील व संग्राम जगताप यांची मैत्री अवघे नगरकर जाणताहेत, पाहताहेत. उड्डाणपूल सोहळ्यात राष्ट्रवादीचे असले तरी आ. जगताप हे पहिल्या रांगेत होते. खा. विखे यांनी आ. जगताप यांचा नितीन गडकरी यांच्याशी ‘खास परिचय’ करून दिला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही परिचयादरम्यान गडकरींसमोर काहीतरी पुटपुटले अन् पाठोपाठ तिघा-चौघांत हास्याची लकेरही उमटली. पक्षभेद विसरून, राजकीय जोडे बाजुला करत नगर विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आल्याचे खा. विखे नेहमीच बोलतात. स्थानिक भाजप नेत्यांना हे रुचत नसले तरी विखेंनी त्याची पर्वा कधी केल्याचे दिसले नाही. ‘प्रोटोकॉल’ वर खासदारांचा भर असतो,हाही नगरकरांचा अनुभव.

प्रस्तावित सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड हायवे नगरमधून जातो. सातारा, सांगली मार्गे पुणे-बेंगलोर हा नवा राष्ट्रीय मार्गही गडकरींच्या विचाराधीन आहे. प्रस्तावित पुणे-औरंगाबाद हा नवा हायवेही नगरमधूनच जाणार आहे. पुणे-औरंगाबादला सुरत-हैदराबादचा एक्सेस दिला जावून पुणे नगरकरांच्या कवेत येणार आहे. पुण्यातील रिंगरोड व पुणे-बेंगलोरची कनेक्टीव्हीटी असेल. मुंबई-दिल्ली हा गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट. मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवरून व्हाया पुणे-सोलापूर, कोल्हापूरची वाहतूक नगरमार्गे दक्षिण भारतात पोहचेल, असा गडकरींंचा रोड मॅप आहे. त्यामुळेच नगर हे भविष्यातील लॉजिस्टीक कॅपिटल बनेल असे गडकरींना वाटते. नगर देशाच्या नकाशावर झळकून नगर विकासाचे भाष्य गडकरींनी या सोहळ्यात केले. तसे ते विखे-जगतापांच्या मैत्रीवरही बोलले. खासदार-आमदार निधी देत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुलाच्या पिलरवर रेखाटण्याच्या विखे-जगतापांच्या कार्याचे कौतुक गडकरींनी केले. इतरांनी त्याचा आर्दश घ्यावा, असेही ते म्हणाले.

विखे-जगताप यांच्या मैत्रीची विण घट्ट झाल्याचे उपस्थित नगरकर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. आ. जगताप हे राष्ट्रवादीचे असले तरी विखेंचे सखासोबती. आ. जगताप यांच्या पक्षांतराच्या वावड्या अनेकदा उठल्या,अधूनमधून त्या नेहमीच उठतात. विखे-जगताप यांच्या मैत्रीने त्यावर पुन्हा राजकीय चर्वण सुरू झाले. त्यामुळे मुंबईची आस लागलेले स्थानिक भाजपातील ‘भावी’ अस्वस्थ झाले नाही तर नवलच. यदाकदाचित राजकीय उलथापालथ झालीच तर पारनेरचे आ. नीलेश लंके यांच्या नावाची ‘भावी दिल्लीकर’ अशी चर्चाही नगरकरांच्या तोंडी ऐकू येण्यास सुरूवात झाली. अहमदनगर नाव सरधोपट असले तरी येथील राजकारण मात्र तितके सरळ नाही. त्यातच मंत्री गडकरींच्या मुखातून विखे-जगताप यांच्या कौतुकाने राजकीय शक्य-अशक्यतेची हवा थंडीत गरमागरम झाली, हे दुर्लक्षून कसे चालेल.
नगरच्या उड्डाणपुलाचा पाया स्व. दिलीप गांधी यांनी रचला तर खा. डॉ. विखे पाटील यांनी त्याचा पाठपुरावा करत ती स्वप्नपूर्ती केली.

मंत्री गडकरींनी गांधी-विखेंचा उल्लेख करत उड्डाणपुलाचे श्रेय दोघांना विभागून दिले. मात्र उड्डाणपुलासाठी आठवडाभर आंदोलन करणारे तत्कालीन आमदार स्व. अनिल राठोड यांचा उल्लेख ते अनावधानाने विसरले. मात्र ही बाब महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती चूक दुरुस्त करत दिलगिरी व्यक्त केली. स्व. अनिल राठोड व तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांचाही उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जुन केला. एकूणच नगरमधील उड्डाणपुलाचा सोहळा हा नगर विकासाचा मॅप जसा ठरला तसा तो विखे-जगताप यांच्या मैत्रीच्या धाग्यानेही चर्चेत आला. आता या मैत्रीची विण नव्या पुलावरून कोणत्या दिशेने उड्डाण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

उद्रेकापूर्वीच व्हा सावध..!

जसे आ. जगताप हे अहमदनगर शहराचे लोकप्रतिनिधी तसे खा. विखे पाटील हेही दिल्लीत नगरचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे नगर विकासाची जबाबदारी ओघाने दोघांवर आलीच. नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय, पण शहरात ना धड रस्ते आहे, ना दररोज नियमित पाणी, ना रस्ते रात्रीच्या अंधारात उजेडाने उजळलेले. रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी लोकप्रतिनिधी या नात्याने विखे-जगतापांना नामानिराळे होता येणार नाही, हेही तितकेच खरे. विकासाच्या मुद्यावर मैत्रीची विण गुंफणार्‍या विखे-जगताप यांनी विकासावरून नगरकरांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वीच सावध झालेलं बरं!

Back to top button