पारगाव : बटाट्याच्या बाजारभावात आणखी घसरण

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : बटाट्याच्या बाजारभावात आणखी घसरण झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या बटाट्याला 10 किलोला 170 ते 180 रुपये बाजारभाव मिळत आहे. बाजारभावात घसरण होत चालल्याने बटाटा उत्पादक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सध्या बटाटा काढणी सुरू आहे. यंदा अतिपावसाचा फटका बसून बटाटा उत्पादनात मोठी घट झाली आहे.
त्यात बाजारभाव कमी मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यानंतर या बाजारभावात आणखी घसरण झाली. सध्याचा दर शेतकर्यांना न परवडणारा आहे. यंदा अतिपावसामुळे तसेच रोगराईमुळे बटाटा पिकावर महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. त्यामुळे मोठे भांडवल शेतकर्यांनी गुंतविले आहे. आता मिळणार्या बाजारभावात भांडवल वसूल होणार नसल्याने बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यंदा अतिपावसाचा फटका बटाट्याला बसून उत्पादनात घट झाली. काढणीला सुरुवात झाल्यानंतर बाजारभाव कमी मिळाला. त्यात आता आणखी घसरण झाल्याने गुंतविलेले भांडवल वसूल होणार नाही. दरवर्षी बटाटा पिकातून नफा मिळण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे.
राजेश टेमगिरे, बटाटा उत्पादक शेतकरी