नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदार नोंदणीत दिंडाेरीने आघाडी घेतली असून, तिथे सर्वाधिक २४४७ पदवीधरांनी नोंद केली आहे. त्या तुलनेत नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघांत नोंदणीला अल्प प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक शाखेकडे पदवीधरसाठी एकूण २० हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
येत्या फेब्रुवारीत नाशिक पदवीधर मतदारसंघाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधून पदवीधरांची मतदार नोंदणी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून एक ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत २० हजार ३५२ मतदारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी दोन हजार ४४७ अर्ज एकट्या दिंडोरी तालुक्यातून जमा झाले आहेत. त्याखालोखाल बागलाण तालुक्यातून दोन हजार ४०१ जणांनी अर्ज जमा केले आहेत.
एक हजारांहून अधिक जणांनी मतदार नोंदणी केलेल्या मतदारसंघाची संख्या आठ आहे. यामध्ये सिन्नर, इगतपुरी, नाशिक पूर्व, येवला, नांदगाव, मालेगाव मध्य या मतदारसंघांचाही समावेश आहे. आतापर्यंत जमा झालेल्या २० हजार ५३२ पैकी १९ हजार ८७२ अर्ज मंजूर झाले आहेत. तर ४७७ अर्ज अपात्र ठरले आहेत. दरम्यान, नोंदणीवेळी संबंधित पदवीधर व्यक्तीने त्याचे पदवी घेतल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रक अर्जासोबत सादर करून ते तपासून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे नोंदणीकडे पदवीधरांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्याचवेळी दिंडोरीत प्रशासनाने सोशल मीडियावरून पदवीधरांना नोंदणीचे आवाहन केले. मतदार नोंदणी अर्ज घेऊन येणाऱ्या मतदाराला आपण सहज उपलब्ध होऊ, याची काळजी सर्व नऊ मंडळ अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे तालुक्यात नोंदणीचा टक्का अधिक आहे.
पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, यासाठी तालुक्यात सोशल मीडियाद्वारे जनजागृती सुरू आहे. तालुक्यात नऊ मंडळ अधिकाऱ्यांनी प्राधान्याने प्रत्येकाने अर्जासोबतची कागदपत्रे लगेचच तपासून देतात. त्यामुळे मतदारांचा वेळ आणि हेलपाटे वाचले असून नोंदणी वेगाने झाली.
– पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी
तालुकानिहाय मतदार नोंदणी
दिंडोरी २४४७, बागलाण २४०१, सिन्नर २०८५, इगतपुरी १५११, येवला १३५१, मालेगाव मध्य १३२५, नांदगाव १२५७, नाशिक पूर्व १०९५, देवळा ९९७, कळवण ९६०, सुरगाणा ८६३, निफाड ७७०, मालेगाव बाह्य ६३४, नाशिक पश्चिम ५५०, नाशिक मध्य ५३२, पेठ ५३०, त्र्यंबकेश्वर ४०५, देवळाली ३३४, चांदवड ३०५ (एकूण २०,३५२).