संरक्षण : लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा | पुढारी

संरक्षण : लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा

जगदीश काळे : घरात किंवा बँकेत दागिने ठेवल्यानंतर त्याचा विमा देखील उतरवता येतो. पण घरात आणि बँकेत दागिने ठेवण्यात बराच फरक आहे. या दोन्हीचा विमा उतरवण्याच्या नियमातही बरेच अंतर आहे.

भारतात सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. महिला वर्गाला दागिन्यांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. लाखमोलांच्या दागिन्यांची सुरक्षितता हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वी घरात लोखंडी कपाटात किंवा पेटीत दागिने ठेवले जात. तांबे किंवा पितळेच्या डब्यात दागिने ठेवलेले असायचे. काही जण घरात फरशीखाली दागिने ठेवत, तर काही जण देव्हार्‍यात ठेवत असत. कालांतराने दागिने सुरक्षित ठेवण्याची पद्धत बदलली. आता कपाटात आणि वॉर्डरोबमध्ये असलेल्या लॉकरमध्ये दागिने ठेवता येतात. त्याचबरोबर बँकांनीदेखील लॉकर व्यवस्था सुरू केली. पण घरात किंवा बँकेत दागिने ठेवल्यानंतर त्याचा विमादेखील उतरवता येतो. अर्थात, घरात आणि बँकेत दागिने ठेवण्यास बराच फरक आहे. या दोन्हींचा विमा उतरवण्याच्या नियमात बरेच अंतर आहे.

लॉकरची सुरक्षा बँकेची जबाबदारी 

बँक लॉकरमधून अनमोल दागिने गहाळ होण्याचे किंवा चोरीला जाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. बँका काहीवेळा लॉकरची जबाबदारी झटकतात. पण बँकांना जबाबदारी झटकून चालणार नाही. कारण लॉकर हे बँकेच्या हद्दीतच असते आणि त्याची सुरक्षा पाहण्याची जबाबदारी ही बँकेवरच असते. आरबीआयच्या मते आग, चोरी, दरोडा, लूटमार, घर पडणे, बँक कर्मचार्‍यांकडून होणारी फसवणूक आदी कारणांमुळे लॉकरमधील दागिन्यांची हानी होत असेल तर बँका जबाबदारी झटकू शकत नाही. तरीही जबाबदारी टाळत असल्याच्या बातम्या नेहमीच ऐकावयास मिळाल्या आहेत. बँकिंग नियामकच्या गाईडलाईननुसार लॉकरमधील दागिने गायब झाल्यास बँकेकडून वार्षिक शुल्कापोटी वसूल केल्या जाणार्‍या रकमेच्या तब्बल शंभरपट भरपाई देणे बँकेला बंधनकारक असते. दागिन्यांची हानी झाली असेल, तर बँक आपली जबाबदारी झटकू शकत नाही.

लॉकरमधील दागिन्यांचा विमा

बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांना विमा संरक्षण देण्याची पद्धत फार जुनी नाही. अनेक विमा कंपन्या लॉकरमधील दागिन्यांना विमा कवच देतात. विमा कंपन्यांकडून तीन ते चाळीस लाखांपर्यंत विमाकवच प्रदान केले जाते. कवचमध्ये कमी जास्त फरक राहू शकतो.

विमा हमी योजनेत लॉकरचा समावेश नाही

आरबीआयकडून सुरू करण्यात आलेल्या विमा कर्ज हमी योजनेत विमा कवचच्या श्रेणीत लॉकरचा समावेश केलेला नाही. एखादी बँक बंद झाली असेल, तर त्या बँकेत असलेल्या पैशाला पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण असते. परंतु लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर कोणताही विमा नसतो. अर्थात, बँक बंद पडत असेल तर खातेदारांना पत्र पाठवून लॉकर रिकामे करण्याचे सांगितले जाते.

विमा कवचमध्ये कशाचा समावेश

बँक लॉकरमध्ये असलेल्या दागिन्यांना दिल्या जाणार्‍या विमा कवचमध्ये अपघात, बँक कर्मचार्‍याकडून होणारी फसवणूक, दरोडा, जबरदस्तीने हिसकावून घेणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय नैसगिक संकटात बँकेची इमारत कोसळली असेल आणि लॉकरमधील दागिने गायब होत असतील किंवा त्याची हानी झाली असेल, तर त्यापोटी दावा करता येतो. लॉकरमधील दागिन्यांशिवाय मौल्यवान वस्तू जसे की शेअर प्रमाणपत्र, विमा पॉलिसी बाँड, पासपोर्ट, जमिनीची कागदपत्रे आदींनादेखील विमा संरक्षण दिले जाते.

कोणत्या गोष्टीला कवच नाही

विमा पॉलिसीत विमा कंपन्यांकडून उल्लेख केलेल्या गोष्टींशिवाय अन्य कोणत्याही वस्तूला कवच दिले जात नाही. अर्थात, जादा कवच मिळवण्यासाठी अतिरिक्त हप्तादेखील भरावा लागतो. हे कवच रायडरच्या माध्यमातून घेता येते. मात्र लॉकरधारकास बँकेशी चर्चा करावी लागेल.

विमा करार रद्द करण्याची सुविधा

एखादा व्यक्ती लॉकरच्या सुरक्षेवरून विमा पॉलिसीला काही अतिरिक्त लाभ जोडू इच्छित असेल आणि बँकेकडून त्यास नकार दिला जात असेल, तर विमाधारक हा पंधरा दिवसांच्या आत नोटीस पाठवून पॉलिसी रद्द करण्याचा अर्ज देऊ शकतो.

हप्ता कसा निश्चित होतो

विमा कवच हा लॉकरचा आकार, दागिन्यांचे मूल्य आणि लॉकरचे भाडे यावर ठरविले जाते. यानुसार विम्यासाठी वार्षिक हप्ता द्यावा लागतो. म्हणजे पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.

घरातील दागिन्याला विमा कवच

बँकेच्या लॉकरमध्ये असलेल्या मौल्यवान दागिन्यांना देखील काही कंपन्या विमा कवच प्रदान करतात. परंतु अशा प्रकारच्या विमा योजना फारशा प्रचलित नाहीत. अर्थात, घरच्या विम्यात म्हणजेच होम इन्श्युरन्समध्ये अशा प्रकारचे कवच मिळू शकते. घरातील दागिन्यांचा विमा उतरवण्याचे प्रमाण हे एकल म्हणजेच न्यूक्लिअर कुटुंबात अधिक आहे. अशा कुटुंबात पती-पत्नी दोघेही नोकरी करतात आणि घराला दिवसभर कुलूप असते. अशा वेळी एक कुटुंबातील लोक आपल्या घरातील दागिन्यांचा विमा उतरवू शकतात.

Back to top button