यवतमाळ : पेट्रोल पंपाच्या टाकीतून ८ लाखांच्या डिझेलची चोरी | पुढारी

यवतमाळ : पेट्रोल पंपाच्या टाकीतून ८ लाखांच्या डिझेलची चोरी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपाच्या टाकीत पाइप टाकून अज्ञात चोरट्याने ७ लाख ७६ हजार रुपये किमतीचे ८ हजार ३०० लिटर डिझेल लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. पांढरकवडा तालुक्यातील करंजीलगत असलेल्या धारणा गावाजवळ ही घटना घडली. पांढरकवडा पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पांढरकवडा येथील रहिवासी शेखर मधुकरराव केळापुरे यांचा धारणा येथे साई सुमन नावाचा पेट्रोलपंप आहे. पंप मंजूर झाल्याने कंपनीने ३१ जानेवारीला पेट्रोल पंपाच्या टाकीत १० लाख ९९ हजार ५२७ रुपये किमतीचे १२ हजार लिटर डिझेल आणून टाकले. तेव्हापासून डिझेल टाकीतच आहे. पेट्रोल पंपाच्या देखभालीसाठी दोन चौकीदार तैनात आहेत. मजुराअभावी पेट्रोलपंपाचे बांधकाम बंद आहे. १० नोव्हेंबरला पंपावरील चौकीदार विलास संभाजी पाटील याने शेखर केळापुरे यांना फोनवरून पंपावरील टँकजवळ डिझेल सांडले आहे. तसेच बाजूच्या शेतातदेखील मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडलेले असल्याची माहिती दिली.

त्यामुळे शेखर केळापुरे लगेच धारणा येथील पेट्रोलपंपावर पोहोचले. टाकीची तसेच लगतच्या शेताची पाहणी केली असता, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडल्याचे दिसून आले. त्यानंतर पंपावर येऊन टाकीतील डिझेल डीप रॉडने मोजले असता टाकीतील ८ हजार ३०० लिटर डिझेल काढून घेण्यात आल्याची बाब उजेडात आली. यासंदर्भात केळापुरे यांनी पेट्रोलियम कंपनीला माहिती दिली. पांढरकवडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button