सिंधुदुर्ग: गावपळणीनिमित्त निसर्गाच्या सानिध्यात चिंदरवासीय लुटताहेत आनंद | पुढारी

सिंधुदुर्ग: गावपळणीनिमित्त निसर्गाच्या सानिध्यात चिंदरवासीय लुटताहेत आनंद

आचरा : उदय बापर्डेकर : झोपड्यांमधूनच एकमेकांसोबत होणारा मुक्त संवाद सुरू होता. चुलीवरील जेवणाचा खमंग सुवास आणि लहानग्यांचा किलबिलाट, अशा अनोख्या वातावरणात चिंदर गावच्या गावपळणीचा पहिला दिवस उजाडला. गावपळणीच्या निमित्ताने दैनंदिन रहाटगाड्यातून मुक्त होत चिंदरवासीय निसर्ग सानिध्यात राहण्याचा अनोखा आनंद अनुभवत आहेत.

शुक्रवारी दुपारी ढोलाच्या आवाजानंतर चिंदर गाव सोडलेले चिंदरवासीय सीमेबाहेर स्थिरावले आहेत. आचरा सीमेलगत माळरानावर, मसुरे नदीच्या कुशीला तर काहींनी वायंगणी, त्रिंबक गावात आपले संसार थाटले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना ना शाळेचे टेंशन, ना क्लासची भुणभुण. यामुळे युवावर्ग थेट नदीपात्र मासेमारीचा आनंद लुटताना दिसले. एकमेकाला खेटून राहूट्या असल्याने महिलांना गप्पांचे फड जमविण्याची अनोखी संधी लाभली आहे.

सर्वांनी तिखट जेवणाने गावपळणीची पहिली रात्र जागविली. महिलांनी सामुदायिक स्वयंपाकाचा आनंद घेत गप्पांच्या माध्यमांतून शेजारपणाचे नाते अधिक घट्ट विणले. सकारात्मक विचारांची देवाणघेवाणही झाली. सोशल मीडियाचा जमाना असतानाही चिंदर गावातील तरुण चक्क प्रौढांसमवेत हरिनामाचा गजर करताना दिसले. घरातली कुणाची कुरकुर नाही की, समस्या नाही. जणू काही समस्या शिल्लक नाहीत, अशा मोकळ्या वातावरणात निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद चिंदरवासीय मिळवित आहेत.

गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गाव निर्मनुष्य झाले आहे. केवळ गावातून जाणाऱ्या रस्त्यावरुन धावणारी वाहनेच गावातील या नीरव शांततेचा भंग करत आहेत. ग्रामदैवत रवळनाथावर नितांत श्रध्दा चिंदरमधील ग्रामवासीयांची आहे. त्यामुळे श्रध्देने ही परंपरागत गावपळण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button