नाशिक शहर पोलिसांना गस्तीसाठी हवीत १६ नवीन वाहने | पुढारी

नाशिक शहर पोलिसांना गस्तीसाठी हवीत १६ नवीन वाहने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याचबरोबर गस्तीसाठी पोलिसांना वाहनांची नितांत आवश्यकता भासते. शहर पोलिस आयुक्तालयाने नुकतीच जिल्हा वार्षिक योजनेकडे १६ वाहनांसाठी निधीची मागणी केली आहे. निधी मंजूर झाल्यास शहर पोलिसांच्या ताफ्यात नव्याने चारचाकी वाहने येणार आहेत. याआधी ग्रामीण पोलिसांसाठी काही वाहने मंजूर झाली आहेत.

गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांसह परिसरातील वावर महत्त्वाचा असतो. त्यामुळे पोलिसांना २४ तास शहर व ग्रामीण भागात गस्त मारावी लागते. त्याचप्रमाणे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी, तपासासाठी पोलिसांना शहर, जिल्हा व जिल्ह्याबाहेरही जावे लागते. कमी कालावधीत गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना वाहनांची आवश्यकता असते. त्यामुळे पोलिसांची बहुतांश भिस्त त्यांच्या ताफ्यातील वाहनांवर असते. वाहनांअभावी पोलिसांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यातच पोलिसांवरील कामकाजाचा ताण वाढल्याने व पोलिसांचे कामकाज सक्षमपणे होण्यासाठी वाहनांची संख्या वाढवणेही अत्यावश्यक झाले आहे.

शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू होतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी शहर पोलिसांच्या वतीने महामार्गांवर जनजागृती केली जात असून, त्यात अवजड वाहनांना एकाच लेनमधून वाहने चालवण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे अपघातांची संख्या कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ही मोहीम अधिक सक्षमपणे राबविण्यासाठीही वाहनांची गरज आहे. त्यामुळे पोलिसांना वाहनांची गरज असून, त्यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन विभागाकडे वाहनांची मागणी केली आहे. निधी मंजूर झाल्यास शहर पोलिसांना वाहने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

कामाला गती येणार

शहरात पोलिस ठाणे, चौक्या उभारण्यासाठीही प्रस्ताव दिले जातात. मात्र जागा, निधी, मंजुरी यामुळे हे प्रस्तावांवर निर्णय होण्यात अडचणी येत असतात. पोलिसांना वाहनांची गरज सर्वाधिक असल्याने वाहने मिळाल्यास त्यांचे कामकाज सोपे व जलद होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button