‘भारत जोडो’ यात्रेत रोहित पवारांची हजेरी, राहुल गांधींना दिल्या या भेटवस्तू | पुढारी

'भारत जोडो' यात्रेत रोहित पवारांची हजेरी, राहुल गांधींना दिल्या या भेटवस्तू

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सध्या राज्यात बोलबाला असून, महाविकास आघाडीचे अनेक नेतेही आवर्जून यात्रेत सहभागी झाले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट मात्र सर्वांर्थांने वेगळी आणि लक्षवेधी ठरली! राज्याच्या संस्कृती आणि परंपरेची सांगड घालत त्यांनी राहुल गांधींना दिलेल्या भेटवस्तू सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. आमदार पवार हे काल भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचे एक सहयात्री बनले. यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणीही त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी राज्यातील व मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांच्या वतीने आणलेल्या काही भेटवस्तू गांधींना दिल्या. त्यात आदिशक्ती आणि भक्ती-शक्तीचं प्रतीक असलेली प्रतिकृती, वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेलं उपरणं, टोपी, कर्जत-जामखेड मतदारसंघात खर्डा येथील ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर जगातील सर्वांत उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारला आहे. या ’स्वराज्य ध्वजा’ची प्रतिकृतीही त्यांनी राहुल गांधींना भेट दिली. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती हे इंग्रजी आत्मचरित्र त्यांनी राहुल गांधी यांना भेट दिले.

याशिवाय लोकमान्य ते महात्मा, जगाला शांतीचा संदेश देणार्‍या गौतम बुद्धांचा ग्रंथ आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या वारीच्या काढलेल्या निवडक छायाचित्रांचा संग्रह यांचाही या भेटवस्तूंमध्ये समावेश आहे. याबाबतची सर्व छायाचित्रे त्यांनी आपल्या अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. यापैकी वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेले टोपी-उपरणे राहुल गांधींना घालतानाचा फोटो नेटकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. या भेटवस्तूंमुळे रोहित पवार यांची राहुल गांधींसोबतची भेट सर्वार्थाने वेगळी ठरली. ‘कर्जत-जामखेड’ या मतदारसंघाला ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा उल्लेख आमदार पवार अनेकदा करता. त्यानुसार त्यांचे कामही सुरू आहे. परंतु यासोबतच जिथे जातील तिथे ते आपल्या मतदारसंघाचा आणि तेथील नागरिकांचा आवर्जून उल्लेख करतात. कालही ते निदर्शनास आले. राहुल गांधींना दिलेल्या भेटवस्तू या राज्यातील आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी यात्रींसोबतही त्यांनी खुलेपणाने चर्चा केली. तसेच काँग्रेसचे युवा नेते कन्हैय्याकुमार यांच्यासोबत झालेल्या भेटीचे आणि हातात हात घालून चर्चा करीत असल्याचे फोटोही नेटकर्‍यांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘माझे मित्र’ असा खास उल्लेख रोहित पवार यांनी कन्हैय्याकुमार यांचा केला आहे. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार मोहन दादा जोशी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल, आमदार अमित झणक आणि इतर नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली.

शहरी ग्रामीण रोजगार योजना सुरू करा

मनरेगामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी लोकांना रोजगार मिळतो. परंतु शहरी भागातील लोकांना गरज असतानाही अद्यापि तशी कोणतीही सोय नाही. यासाठी आमदार रोहित पवार यांनी अनेकदा ‘शहरी ग्रामीण रोजगार हमी योजना’ सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच मागणीचे पत्र त्यांनी खासदार राहुल गांधी यांनाही दिले. यावर पाठपुरावा करण्याची विनंती त्यांना केली आहे.

विशिष्ट विचारसरणीमुळे देशातील वातावरण गढूळ होत असून समाजासमाजात द्वेष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रेम आणि सद्भावनेच्या पायावर उभ्या असलेल्या भारत जोडो यात्रेची देशात खर्‍या अर्थाने गरज होती. ती राहुल गांधी यांनी भरून काढली. त्यामुळे या यात्रेत आवर्जून सहभागी झालो, याचा आनंद वाटतो.
     -रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

Back to top button