पिंपरी : दै. पुढारी’चे सामाजिक योगदान वाखाणण्याजोगे : पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे | पुढारी

पिंपरी : दै. पुढारी’चे सामाजिक योगदान वाखाणण्याजोगे : पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  दैनिक ‘पुढारी’चे सामाजिक योगदान वाखाणण्याजोगे आहे. सियाचीनमध्ये जवानांसाठी प्रशस्त हॉस्पिटल उभारणे, हा त्याचाच एक भाग आहे. नुकतेच ‘पुढारी’ने पोलिसांसाठी बॅरिकेड्स उपलब्ध करून दिले. त्याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करते, अशा शब्दात पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी ‘पुढारी’चे आभार व्यक्त केले. ‘पुढारी’ रिलीफ फाउंडेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलिसांना वाहतूक नियमन आणि बंदोबस्तासाठी आवश्यक बॅरिकेड्स उप्लब्ध करून देण्यात आले. ‘पुढारी’चे संचालक मंदार पाटील यांच्या उपस्थितीत नुकतेच बॅरिकेड्स सुपूर्द करण्यात आले. या वेळी वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना स्वप्ना गोरे म्हणाल्या की, ‘पुढारी’ने आजवर आपले सामाजिक भान जपले आहे. जवानांसाठी सियाचीन येथे बांधलेले हॉस्पिटल, बेळगाव सीमाप्रश्नी घेलेली भूमिका, कोल्हापूर-सांगली येथे आलेल्या महापुरानंतर पूरग्रस्तांना केलेली मदत, दिव्यांगांचे मोफत लसीकरण, अशा उपक्रमातून ‘पुढारी’ने सर्वसामन्यांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

बॅरिकेड्सच्या माध्यमातून ‘पुढारी’ने केलेली मदत पोलिसांसाठी आगामी काळात फायदेशीर ठरणार आहे. मंदार पाटील म्हणाले की, दै. ‘पुढारी’कडून कायमच सामाजिक कामात योगदान दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांना बॅरिकेड्स देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीत येणारा भाग लक्षात घेता त्यांच्याकडे मनुष्यबळाच्या तुलनेत साधनसामग्री कमी आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी सीएसआर फंडातून पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

देहू आणि आळंदी येथे कार्तिकीवारी सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी दाखल झाले असून, त्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी बॅरिकेड्सची आवश्यकता होती. ‘पुढारी’ने योग्य वेळी बॅरिकेड्स उपलब्ध करून दिले आहेत.
                                – सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग.

Back to top button