डॉ. भारती पवार : इतिहासाने अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नाही | पुढारी

डॉ. भारती पवार : इतिहासाने अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जल, जंगल आणि जमिनीसाठी आदिवासी बांधवांनी संघर्ष केला. देशाच्या उभारणीतही आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र, इतिहासाने आजही अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली.

आदिवासी विकास विभागाकडून आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव आणि जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाप्रसंगी ना. पवार बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, काळानुरूप शासनाच्या आदिवासी विभागात डिजिटलायजेशन झाले आहे. परंतु, हा बदल घडविताना समाजातील अनेक क्रांतिकारकांची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत या क्रांतिकारकांचे कार्य पोहोचविण्यासाठी आदिवासी विभागाने गावागावांमधून क्रांतिकारकांची माहिती गोळा करावी. गोळा झालेली माहिती युवा पिढीला उपलब्ध करून देण्याची सूचना केली. समाजात आजही शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या समस्या कायम आहेत. हीच बाब लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 112 जिल्हे दत्तक घेत तेथील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या माध्यमातून विकासाची गंगा पोहोचविण्याचे अभियान हाती घेतले आहे. त्यामध्ये आदिवासीबहुल काही जिल्हे असल्याची माहिती पवारांनी दिली. त्याच धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील असे जिल्हे दत्तक घेत तेथे उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी आदिवासीमंत्री गावित यांच्याकडे केली. आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी प्रास्ताविकात राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणार्‍या आदिवासी क्रांतिकारकांचा देशवासीयांना विसर पडला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय स्तरावर जनजातीय गौरव दिवस साजरा करण्याचा निर्णय घेत क्रांतिकारकांप्रती सन्मान व्यक्त केल्याची भावना व्यक्त केली. राज्यपाल कोश्यारी यांनी वनपट्टे व घरे वाटपातील कार्य चांगले असल्याचे सांगत आदिवासींच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. पालकमंत्री दादा भुसे यांनी आदिवासी बांधवांसाठी शासन मुंबईत पुरणपोळीचे ताट तयार करते. पण, मधले काही लांडगे आणि मांजरांमुळे हे ताट शेवटच्या आदिवासींपर्यंत पोहोचत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. नरहरी झिरवाळ यांनी आदिवासींमध्ये विविध प्रकारचे स्किल आहे. पण, मार्केटिंग जमत नसल्याने आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळत नसल्याचे सांगितले. हे चित्र बदलण्यासाठी शासनाने आदिवासींना प्रशिक्षण देतानाच दिंडोरीतील मडकीजांब येथे प्रायोगिक तत्त्वावर आदिवासी क्लस्टर सुरू करण्याची मागणी आदिवासी मंर्त्यांकडे केली. या प्रकल्पाला मागील शासनाने मंजुरी दिल्याचे त्यांनी यानिमित्ताने अधोरेखित केले.

ती टोपी मी सांभाळून ठेवेन : भुसे
राज्यपाल कोश्यारी यांनी एका स्टॉलवरून आदिवासी प्रकारची टोपी खरेदी करून ती पालकमंत्री दादा भुसे यांच्या डोक्यावर ठेवली. त्यानंतर आपल्या भाषणात भुसे यांनी याच टोपीचा धागा पकडत राज्यपालांनी 500 रुपये देऊन खरेदी केलेली टोपी प्रेमाने मला भेट दिली. त्यांची आठवण म्हणून ही टोपी मी सांभाळून ठेवेन, असे भुसे यांनी सांगताच कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.

राज्यपालांना खरेदीचा मोह
महोत्सव स्थळावर आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहे. या स्टॉलला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू खरेदीचा मोह कोश्यारी यांना राहवला नाही. त्यांनी लाकडी वस्तू, वारली पेंटिंगची खरेदी केली. एका स्टॉलवर नागली खरेदी करताना विक्रेत्या महिलेच्या हाती 500 रुपयांची नोट दिली.

हेही वाचा:

Back to top button