नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा | पुढारी

नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहन कर्जवसुली करणार्‍या प्रतिनिधीने तरुणीच्या जप्त केलेल्या दुचाकीच्या डिकीत गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संबंंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया धनंजय पटवर्धन (28, रा. काठे गल्ली) असे संशयित तरुणीचे नाव आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात राहत्या घराची साफसफाई करताना हा गावठी कट्टा रियाला सापडला होता. पूर्ण गंजलेल्या गावठी कट्ट्याला अँटिक वस्तू समजून रियाने ती स्वत:जवळ ठेवली. मात्र, ही हौस तिला चांगलीच महागात पडल्याचे समोर आले. रियाने कर्ज काढून दुचाकी घेतली असून, कर्ज नियमित भरलेले नाही. त्यामुळे खासगी कंपनीचे प्रतिनिधी नरेंद्र शिलेदार यांनी रियाची दुचाकी जप्त केली. हे वाहन सिडको येथील कंपनीच्या कार्यालयात नेत असताना शिलेदार यांना कंपनीतील योगेश कटारे या अधिकार्‍याने फोन करून वाहनाची डिकी तपासण्यास सांगितली. डिकीत गावठी कट्टा आढळून आल्याने शिलेदार व कटारे यांनी पोलिसांना माहिती देत ते वाहन रिया यांच्या घरी नेले. तिथे भद्रकाली पोलिसांनी धाव घेत घटनास्थळी पंचनामा करून मोपेड वाहनासह गावठी कट्टा जप्त करून रियाविरोधात हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. हा कट्टा रियाच्या नातेवाइकांच्या घरात कोठून आला याचा पोलिस शोध घेत आहे. तिची व नातेवाइकांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया तिच्या आत्या:च्या घरात राहते. या घराची साफसफाई करताना रियाला जुना गावठी कट्टा सापडला. हा कट्टा पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी तिने बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे तपासात समोर आले आहे.

‘डिकीमध्ये पिस्तूल आहे’ चा मेसेज
रियाची दुचाकी घेण्यासाठी नरेंद्र शिलेदार गेले असता तिने कर्ज घेतलेल्या कंपनीच्या अधिकार्‍यास मेसेज केला होता. हा मेसेज त्यांना वाचायला सांगा, असे तिने शिलेदार यांना सांगितले. दरम्यान, शिलेदार हे वडाळा नाक्यापर्यंत पोहोचले असताना ’डिकीमध्ये पिस्तूल आहे’ अशा आशयाचा मेसेज अधिकार्‍याने वाचला. त्यामुळे अधिकार्‍याने मेसेज वाचून शिलेदार यांना दुचाकीची डिकी तपासण्यास सांगितले. डिकीत शस्त्र आढळून आल्याने त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button