कोल्हापूर : लोकसभेची प्रशासकीय तयारी सुरू | पुढारी

कोल्हापूर : लोकसभेची प्रशासकीय तयारी सुरू

कोल्हापूर, अनिल देशमुख : लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी आहे. मात्र, या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी लागणारी ईव्हीएम मशिन जिल्ह्यात मंगळवारी दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुमारे वर्षभरापूर्वी सुरू होते, त्यानुसार ती एप्रिल-मे मध्ये सुरू होणे अपेक्षित असतानाच त्याहीपेक्षा सहा महिने आधीच तयारी सुरू झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लोकसभेच्या निवडणुका मे 2019 मध्ये झाल्या होत्या. यामुळे मे 2024 साली लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी मात्र सुमारे दीड वर्षे अगोदरच सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले असे लोकसभेसाठी दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांसाठी आवश्यक ईव्हीएम मशिन कर्नाटकातून आणण्यात येणार आहेत. कर्नाटकातील हावेरी आणि बेळगाव येथे यापूर्वीच्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मशिन कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार आहेत.

जिल्ह्यातील दोन मतदारसंघांसाठी आवश्यक ईव्हीएम मशिन उद्या मंगळवारी रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल होत आहेत. याकरिता अधिकारी, कर्मचार्‍यांची पथके कर्नाटकात रवाना झाली आहेत. ही मशिन कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर त्याची पुढील प्रक्रियाही सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मशिन दाखल झाल्यानंतर त्यांची दोविेळा तपासणी केली जाते. यानंतर ही मशिन तांत्रिकद़ृष्ट्या योग्य आहेत की नाही, याची खात्री करून ती सील करून ठेवली जातात. या सर्व प्रक्रियेला चार-पाच महिन्यांचा कालावधी जातो. ही सर्व प्रक्रिया कोणत्याही निवडणुकीच्या अगोदर जास्तीत वर्षभरापूर्वी सुरू केली जाते. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही प्रक्रिया मे-2023 पासून सुरू होईल, असे अपेक्षित होते. मात्र, देशभरात सर्वत्र ही प्रक्रिया दीड वर्षे अगोदरच सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक ईव्हीएम मशिन मंगळवारी रात्री जिल्ह्यात दाखल होतील. यानंतर राजाराम तलाव येथील निवडणूक विभागाच्या गोदामात ती पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. यानंतर त्याची पुढील प्रक्रियाही सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासर्व प्रक्रियेमुळे निवडणुका लवकर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

कोल्हापूरची मशिन दिल्लीला जाणार

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीकरिता वापरलेली ईव्हीएम मशिन दिल्लीला पाठवली जाणार आहेत. त्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत दिल्ली प्रशासनाचे पथक हे मशिन नेण्यासाठी कोल्हापुरात येणार आहे.

Back to top button