बिबटप्रवण क्षेत्रात शेतपंपाला दिवसा वीज द्या! जुन्नर वनविभागाचा महावितरणला प्रस्ताव | पुढारी

बिबटप्रवण क्षेत्रात शेतपंपाला दिवसा वीज द्या! जुन्नर वनविभागाचा महावितरणला प्रस्ताव

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील जांबूत येथे बिबट हल्ल्यात ठार झालेल्या सचिन जोरी आणि पूजा नरवडे दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेत बिबट्या प्रवण क्षेत्र असलेल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील गावांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, याबाबतचा प्रस्ताव महावितरणला जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिला आहे. महावितरण याबाबत काय भूमिका घेते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

जुन्नर वनविभागातील शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी वनविभागाने बिबट प्रवण क्षेत्रातील वस्तुस्थितीचा प्रस्ताव महावितरणला द्यावा, अशी मागणी माजी सभापती देवदत्त निकम यांनी वनविभागाकडे केली होती. जांबूत येथील बिबट हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनीदेखील महावितरणला याबाबत सूचना केली होती. वनविभागाकडून बिबट मानव संघर्षाबाबतचा प्रस्ताव नुकताच महावितरणला देण्यात आला आहे.

जुन्नर वनविभागात जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर हे तालुके समाविष्ट असून, वनविभागाच्या ताब्यात सुमारे 582.36 चौ.कि.मी. वनजमिनीचे क्षेत्र आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीने ते जुन्नर, मंचर, ओतूर, शिरूर, घोडेगाव, खेड, चाकण या सात वनपरिक्षेत्रामध्ये विभागले गेले आहेत. या भागातील शाश्वत पाण्याच्या सुविधेमुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. उसात बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर असते. बिबट्याची मादीदेखील याच पिकात बछड्यांना जन्म देत आहे. या भागात बिबट्यांचा मुक्त संचार असून, पाळीव

प्राण्यांवरील, तसेच मनुष्यावरील हल्ल्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. ज्या ठिकाणी रात्रीचा वीजपुरवठा आहे, त्या भागात शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागते. बिबट्या भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. आतापर्यंत झालेले बहुतांश हल्ले रात्रीच्या सुमारास झाले आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जात असताना किंवा इतर कामासाठी जात असताना हे हल्ले झाले आहेत.

आगामी काळात बिबट हल्ले होऊ नयेत, तसेच मानव आणि बिबट संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने शेतपंपांसाठीचा विद्युत पुरवठा रात्री न करता दिवसा केल्यास शेतकर्‍यांना रात्री शेतीला पाणी देण्याची वेळ येणार नाही. तसेच सिंगल फेज विद्युत पुरवठा वाडी वस्तीवर, गावांमध्ये रात्री ठेवल्यास प्रकाश व्यवस्था उपलब्ध राहील.

परिणामी, वन्य प्राणी मानवीवस्तीवर येण्यास प्रतिबंध होऊन बिबट-मानव हा संघर्ष टाळण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत अखंडित विद्युतपुरवठा करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असा प्रस्ताव जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी महावितरणला दिला आहे.

Back to top button