नाशिक : सोने दीड तर चांदी तीन हजारांनी महाग | पुढारी

नाशिक : सोने दीड तर चांदी तीन हजारांनी महाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम असून, लवकरच सर्वत्र लग्नांचा बार उडताना बघावयास मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस लग्नाच्या तिथी असल्याने सध्या सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. अशात सोन्यासह चांदीच्या किमतीही वाढल्याने, ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळीच्या काळात स्वस्त झालेल्या सोन्याच्या दरात दीड तर चांदी तब्बल तीन हजारांनी महागली आहे.

दिवाळीच्या काळात २४ कॅरेट सोन्याचा दर ५१ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला होता. आता हा दर ५३ हजारांवर गेल्याने सोने दीड हजारांनी महागले आहे. बुधवारी (दि.९) सोन्याच्या दरात ५५६ रुपयांची दरवाढ झाली तर चांदीही १३०५ रुपयांनी महाग झाली. या वाढीमुळे सध्या २४ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ५३ हजारांवर पोहोचले तर २२ कॅरेट प्रती १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ५१ हजार ५०० रुपयांवर आला आहे. दरम्यान, दिवाळीच्या काळात सोन्यासह चांदीचे दर कमी झाल्याने अनेकांनी लग्नसराई लक्षात घेऊन सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले. सध्या सोन्यात गुंतवणूक म्हणूनही बघितले जात असल्याने सोने खरेदीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. विशेषत: तरुण वर्गाकडून सोने-चांदीत गुंतवणुकीचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे काही अंशी दरवाढ होऊनदेखील खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, २०२० मध्ये सोने-चांदीने उच्चांकी दर गाठला आहे. त्यावेळी सोन्याचा भाव ५६ हजार २०० रुपये प्रती १० ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याचवेळी चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे १८ हजार ४३० रुपये प्रतिकिलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी ७९ हजार ९८० रुपये प्रतिकिलो आहे.

दिवाळीच्या काळातच सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सोने स्वस्त झाल्याने, ग्राहकांना दिवाळीच्या मुहूर्तावर येथेच्छ खरेदी करता आली. लग्न घरच्या वधू-वरांकडील मंडळींनीही दिवाळीचा मुहूर्त साधत सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले. सोने-चांदीच्या दरात पुढच्या काळातही चढ-उतार होणारच असल्याने खरेदीची हीच योग्य वेळ आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन.

हेही वाचा:

Back to top button