धुळे; पुढारी वृत्तसेवा : Dhule Mayor Election : धुळ्याच्या महापौर पदासाठी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे ७४ पैकी ५१ नगरसेवक असल्याने स्पष्ट बहुमत आहे. मात्र असे असूनही जळगाव पॅटर्नप्रमाणे फटका बसू नये यासाठी नगरसेवकांना सहलीस पाठवण्यात आले आहे.
भाजपाच्यावतीने नगरसेवक प्रदीप कर्पे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रीयेनंतरच अंतिम निर्णय जाहीर होणार आहे.
धुळे महानगरपालिकेच्या पहील्या अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने महापौर चंद्रकांत सोनार हे पायउतार झाले. तत्पुर्वी नगरसेवक संजय जाधव यांनी दुस-या टप्प्यातील कार्यकाळासाठी अनुसुचित जमातीच्या उमेदवाराचे आरक्षण आढण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यावर न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण रद करुन नव्याने कायदेशीर पध्दतीने महापौरासाठी आरक्षणाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात सवोच्च न्यायालयात नगरसेवक प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी यांनी आव्हान दिले होते.
यात ओबीसीचे आरक्षण पुर्ववत राहीले. यानंतर आता महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन मतदान १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात भाजपाच्यावतीने प्रदीप कर्पे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्यासमवेत मावळते महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेविका योगीताताई बागुल, गजेंद्र अंपळकर, किरणताई कुलेवार, राकेश कुलेवार आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसच्यावतीने मदीना समशेर पिंजारी, शिवसेनेतर्फे ज्योत्स्ना पाटील , एमआयएमतर्फे सईदा इकबाल अन्सारी तर अपक्ष उमेदवार मोमीन आसिफ इस्माईल यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
धुळे महानगरपालिकेत भाजपाचे निर्विवाद बहुमत असले तरीही महापौरपदाच्या निवडीसाठी आमदार फारुखशाह व राष्ट्रवादीचे रणजीत भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी लक्ष घातल्याने जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाने नगरसेवकांना बाहेरगावी पाठवले आहे.
पहील्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजपाची सत्ता असून देखील भाजपाच्या नगरसेवकांनीच मनपामधे भ्रष्टाचार सुरू असून अनेक बेकायदेशीर कामांबाबत घरचा आहेर देत आवाज उठवला होता.
यातून एक मोठा गट नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यातच गेल्यावर्षी भाजपाचे १७ नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचे विधान माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील केल्याने भाजपाला बहुमत असून देखिल फुट पडण्याची भीती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व प्रकारचा खबरदारीचा उपाय घेतला जातो आहे.
यातून आता १७ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतरच खरा प्रकार स्पष्ट होणार आहे.