नाशिक : अखेर पेठरोड होणार ‘स्मार्ट’ | पुढारी

नाशिक : अखेर पेठरोड होणार ‘स्मार्ट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खड्ड्यांमुळे सर्वाधिक चर्चेत असलेला पेठ रोड अखेर स्मार्ट होणार आहे. साडेसहा किमीचा हा रस्ता पहिल्या टप्प्यात ४ किमीपर्यंत काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. महासभेवर याबाबतची मंजुरी घेतल्यानंतरच स्मार्ट सिटीच्या शिल्लक निधीतून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्याच्या संपूर्ण काँक्रिटीकरणासाठी ७१ कोटी इतका खर्च लागणार असून,महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही निधी मागून मिळत नसल्याने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, तांत्रिक तपासणीसाठी संबंधित प्रस्ताव लेखाधिकाऱ्यांकडे पाठवला असून, त्यानंतर या संदर्भातील ठराव स्मार्ट सिटीकडे पाठवला जाणार आहे.

गुजरातमधून नाशिकच्या वेशीत शिरल्यानंतर तब्बल साडेसहा किलोमीटरचा हा रस्ता पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे वाहनधारकांना कष्टप्रद होत असून, या रस्त्याचे काम केव्हा केले जाईल, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. त्यातच यंदाच्या पावसामुळे या रस्त्याची पूर्णत: चाळण झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करताना अक्षरश: कसरत करावी लागते. अशीच काहीशी स्थिती राहू हॉटेलपासून पुढे दिंडोरीच्या हद्दची सुरुवात आणि नाशिकच्या वेशीचा शेवट या रस्त्याचीही झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, त्यानंतर या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, बऱ्याच ठिकाणी रस्ता खचून गेला आहे. त्यामुळे गुजरातकडून नाशिकमध्ये येणारे प्रवासी रस्त्यावरून नाशिकचे वाभाडे काढत आहेत. त्याचबरोबर दिंडोरी, पेठकडून भाजीपाला घेऊन येणारे शेतकरीही या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. दरम्यान, आता स्मार्ट सिटी कंपनीने शिल्लक निधीतून रस्ता पूर्ण करण्याची तयारी दाखवली असून त्यासाठी महासभेने प्रस्ताव मंजूर करून लेखाधिकार्‍यांकडे तपासणीसाठी पाठवला आहे.

आ. ढिकलेंच्या पाठपुराव्याला यश….
या रस्ता दुरुस्तीसाठी आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी मनपाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच त्यांनी स्मार्ट सिटीतून निधी मिळण्याबाबतची मागणी केली असता, महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीशी चर्चा करीत अखेर या रस्ता दुरुस्तीसाठी सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. आता महासभेत निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून तो स्मार्ट सिटी कंपनीकडे पाठवला जाणार असून, रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागण्याचे संकेत मिळत आहेत.

हाॅटेल राऊ ते नाशिकची हद्दीपर्यंतचा पेठ राेड दुरुस्त हाेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियाेजन समितीकडे मागणी केली असून, स्मार्ट सिटीमार्फत निधी मागितला जात आहे. त्यानंतर निधीची अडचण असल्यास शासनाकडूनही निधी मागणार. – ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.

हेही वाचा:

Back to top button