कोल्हापूर : 475 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान; 20 डिसेंबरला मतमोजणी | पुढारी

कोल्हापूर : 475 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान; 20 डिसेंबरला मतमोजणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी बुधवारी सुरू झाली. या ग्रामपंचायतींसह राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. बुधवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली. याचवेळी थेट सरपंचपदासाठीही निवडणूक होणार आहे. कोल्हापूर शहरालगतच्या बहुतांशी सर्वच गावांत निवडणुका होत असल्याने महिनाभर जिल्ह्यात राजकीय धुरळा उडणार आहे. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील जवळपास एक तृतीयांश आणि प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाच्या गावांच्या निवडणुका होत आहेत. थेट सरपंचपदासाठीही मतदान होणार असल्याने
या निवडणुकांत राजकीय चुरस कमालीची वाढणार आहे. राज्यातील बदलेली राजकीय समीकरणे, त्याची जिल्ह्यातील परिस्थिती, स्थानिक पातळीवरील वर्चस्वासाठी आणि अस्तित्वासाठी गटा-तटाची ईर्ष्या या निवडणुकीत दिसणार आहे.

20 डिसेंबर रोजी मतमोजणी

या निवडणुकीसाठी 26 नोव्हेंबरपासून दि. 2 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दि. 5 डिसेंबर रोजी छाननी होईल. दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी चिन्हवाटप होणार आहे. निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींसाठी दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून, दि.20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरावे लागणार

या निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे (ऑनलाईन) उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज पूर्ण भरावा लागणार असून, अर्जातील कोणताही रकाना (कॉलम) रिकामा सोडता येणार नाही. जो मजकूर लागू नाही, त्या ठिकाणी लागू नाही, असा उल्लेख करावा लागणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्र अथवा समितीकडील प्रस्तावाचा पुरावा

जे उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र नसेल, तर उमेदवारी अर्जासोबत जात वैधता पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची प्रत जोडावी लागणार आहे. निवडून आलेल्या तारखेपासून पुढील 12 महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

आचारसंहिता आजपासूनच लागू

निवडणूक जाहीर झालेल्या गावांत, त्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निवडणूक जाहीर झालेल्या गावांतील राजकीय पक्षांचे फलक उद्या, दुपारपर्यंत काढण्यात येणार आहेत.

अप्पर जिल्हाधिकारी निरीक्षक

ज्या जिल्ह्यांत 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, तेथे अप्पर जिल्हाधिकार्‍यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16 हजारांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती

यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतदान, मतमोजणी आदींसाठी एकूण 16 हजारांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती होणार आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच साखर कारखाने, बाजार समिती आदी निवडणुका असल्याने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सरपंचपदाची थेट निवडणूक होणार असल्याने नेते या निवडीत थेट लक्ष घालणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम असा…

उमेदवारी अर्ज सादर करणे : दि. 26 नोव्हेंबर ते दि. 2 डिसेंबर
अर्जांची छाननी : दि. 5 डिसेंबर
अर्ज माघार व चिन्हवाटप : दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत
मतदान : दि. 18 डिसेंबर (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30)
मतमोजणी : दि. 20 डिसेंबर

राज्यातील 7,751 ग्रा.पं.च्या निवडणुका जाहीर

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या 18 डिसेंबरला होणार आहेत. त्यासाठी संबंधित ठिकाणी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या ग्रामपंचायतींची 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी केली.

Back to top button