नाशिक : बंदीवरून क्रशरचालक वनाधिकाऱ्यांच्या दारी

गौडबंगाल सारूळचे www.pudhari.news
गौडबंगाल सारूळचे www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : गौरव जोशी

जिल्हा प्रशासनाने अवैध उत्खनन प्रकरणी केलेली कारवाई टाळण्यासाठी सारूळचे खाणपट्टेधारक आणि क्रशरचालक विविध प्रकारे चाचपणी करत आहेत. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये आलेले राज्याचे वनविभागाचे मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी भेट नाकारल्याने संबंधितांना खाली मान घालून परतावे लागले. त्याचवेळी वरिष्ठांची भेट नाकारण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवैधपणे डोंगर पोखरल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने सारूळ व परिसरातील २१ खडीक्रशर सील केले. या कारवाईमुळे खाणपट्टेधारक व क्रशरचालकांना धक्का बसला. कारवाई टाळण्यासाठी संबंधित क्रशरचालक साम आणि दाम अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न करत असल्याचे समजते आहे. याचदरम्यान, गेल्या आठवड्यात राज्याच्या वनविभागाचे मुख्य अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये येऊन विभागाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीची कुणकुण लागताच क्रशरचालकांनी शासकीय विश्रामगृह गाठले. मात्र, वरिष्ठांनी भेट नाकारली. परिणामी स्थानिक अधिकाऱ्यांच्या हाती निवेदन देत क्रशरचालकांनी तेथून काढता पाय घेतला.

सारूळ आणि परिसरात दगड-खाणींच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे. गेल्या काही वर्षांत डोंगरच्या डोंगर पोखरून अनेक जण मालामालदेखील झाले. वाढता व्यवसाय आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे सारूळचा प्रश्न दिवसेंदिवस नाजूक बनला असताना डाेंगर उद्धवस्त होत चालले आहे. अशावेळी खरी आवश्यकता आहे ती सदर खाणी कायमस्वरूपी बंद करण्याची. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. पण, प्रशासनातील काही जण टक्केवारीच्या माेहात अडकल्याने खाणपट्टेधारक व क्रशरचालकांचे फावते आहे. यातून डाेंगरांच्या अस्तित्वावरच घाला घातला जात आहे. मात्र, या सर्व घटनेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी नाकारलेली भेट हा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. क्रशरचालकांसाठी हा मोठा धक्का असला तरी महसूलसह अन्य विभागांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे.

सारूळ केवळ उदाहरण…

अवैध गौणखनिज उत्खननाचे सारूळ हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. जिल्ह्यात दिंडोरी, सिन्नर, मालेगाव, निफाडमध्ये राजरोसपणे मोठ्या प्रमाणात डोंगरांची कत्तल होत असून, नद्यांमधून वारेमाप वाळू उपसा करताना त्यांचा जीव घोटला जातोय. अन्य तालुक्यांमध्येही वेगळे चित्र नाही. त्यामुळे स्वत:चे हित साधण्यासाठी निसर्गसंपदेवर घाला घालणाऱ्या माफियांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना आवर घातला पाहिजे. अन्यथा पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

– समाप्त

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news