धुळे : फार्मसी महाविद्यालयाने पटकावले चार पारितोषिके | पुढारी

धुळे : फार्मसी महाविद्यालयाने पटकावले चार पारितोषिके

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूरच्या एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाने स्टार्टअप यात्रेत ६५ हजार रुपयांचे चार पारितोषिके प्राप्त पटकावले आहे.

राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनामार्फत विविध जिल्हा स्तरावर महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्यात जळगाव व नंदुरबार जिल्हा स्तरावर एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना एकूण ६५ हजारांचे चार पारितोषिके मिळाले आहेत. त्यात जळगाव जिल्हा स्तरावर महाविद्यालयाचे कांचन कोळी व रुतिका पाटील यांना सुपीक दिवस ट्रॅकर या नवसंकल्पनेवर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक तसेच १५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक तर प्रा. चेतन भावसार यांना पुरुष वंध्यत्वावर उपाय या नवसंकल्पनेवर पारितोषिक मिळाले. १० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मार्कर कंपाऊंडचे व्यवसाय मॉडेल या नवसंकल्पनेवर अदिती शर्मा आणि संकेत निकुंभ यांना मिळाले. नंदुरबार जिल्हा स्तरावर गौरव सूर्यवंशी याला तीन क्यारीन व्यवसाय मॉडेल या नवसंकल्पनेवर १५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी दिली.

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर करण्यात आले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. त्या माध्यमातून धोरणाच्या आधारे राज्यामधे स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरीता पूरक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता इनक्युबेटर्सची स्थापना, गुणवत्ता परीक्षण व बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. ईका फार्मासुटीकल्स, अहमदाबाद यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट्ट पदव्युत्तर शोध प्रबंधासाठीचा रजनीभाई व्ही. पटेल पुरस्कार सलग तिसऱ्यांदा महाविद्यालयाला मिळाला आहे. भारतातील विविध महाविद्यालयातून शेकडो संशोधक स्पर्धेत सहभागी होतात. मात्र त्यातून उत्कृष्ट प्रबंधाला पारितोषिक देवून गौरविण्यात येते. तसेच ११ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर’ शिबिर आयोजित करणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आमदार अमरिश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी आदींनी विजेत्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

हेही वाचा:

Back to top button