पिंपरी : 'हर हर महादेव'बाबत 'संभाजी ब्रिगेड'ची आक्रमक भूमिका, सिनेमाचा शो पाडला बंद | पुढारी

पिंपरी : 'हर हर महादेव'बाबत 'संभाजी ब्रिगेड'ची आक्रमक भूमिका, सिनेमाचा शो पाडला बंद

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी (दि. ७) दुपारी पिंपरी येथील विशाल थिएटरमध्ये घुसून कार्यकर्त्यांनी चित्रपट बंद पाडला. याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

त्यानंतर संभाजी ब्रिगेडने देखील इतिहासाची मोडतोड करणारा व खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव” चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, तरी देखील चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ब्रिगेडचे कार्यकर्ते पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये घुसले. त्यांनी चित्रपट बंद पाडून थिएटर चालकाला निवेदन दिले. अचानक झालेल्या या गोंधळामुळे थिएटरमध्ये गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना शांत केले.

Back to top button