नाशिक : ऊर्ध्व गोदावरीच्या पंधराशे कोटींच्या अहवालास मान्यता | पुढारी

नाशिक : ऊर्ध्व गोदावरीच्या पंधराशे कोटींच्या अहवालास मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास 1498.61 कोटी रुपये किमतीस मान्यता प्रदान करण्यात आली असून, याबाबत शासनाकडून आदेश जारी करण्यात आले. यामुळे मांजरपाडासह (देवसाने) वळण योजनांच्या कामांना गती मिळणार आहे. यामुळे 580.88 कोटी रुपयांची पुणेगाव दरसवाडीसह ओझरखेड पालखेड कालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ यांच्या पाठपुराव्यानंतर मागील महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पास चतुर्थ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आज शासनाकडून चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास मंजुरी देण्यात आली. ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प हा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण व आदिवासी क्षेत्रातील प्रकल्प असून, गोदावरी नदीच्या उपनद्यांवर आहे. प्रकल्पाच्या पाणीवापरानुसार नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील 74,210 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव अशा सहा प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे करंजवण, वाघाड, ओझरखेड व पुणेगाव या प्रकल्पांच्या स्थिरीकरणासाठी देवसाने (मांजरपाडा) वळण योजना व इतर 11 प्रवाही वळण योजनांचा समावेश आहे. सदर प्रकल्पास यापूर्वी प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या होत्या.
दरम्यानच्या काळात दरसूचीतील वाढ, भाववाढ, संकल्पनातील बदल, भूसंपादनाच्या किमतीत झालेली वाढ व इतर कारणांमुळे झालेली वाढ इत्यादींमुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळाने चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासनास सादर केला होता. 2018-19 च्या दरसूचीवर आधारित ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाची किंमत 1498.61 कोटी रुपये होती. तसेच कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी एकूण 633.45 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आलेली असून, वाघाडसाठी 11.97 कोटी, करंजवणसाठी 4.98 कोटी, ओझरखेडसाठी 73.18 कोटी, पालखेडसाठी 67.90 कोटी, तिसगावसाठी 66 लाख, पुणेगावसाठी 294.96 कोटी, तर दरसवाडीसाठी 179.79 कोटी रुपये निधिस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पास मिळालेल्या चतुर्थ प्रशासकीय मान्यतेने जिल्ह्यातील जलसंधारणाचे प्रकल्प मार्गी लागणार असून, येवल्यातील मांजरपाडासह जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती मिळणार आहे.
– छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

योजनांसाठी असा निधी 

नाशिक जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजना -206.51 कोटी,
देवसाणे मांजरपाडा प्रकल्प- 464.40 कोटी,
वाघाड प्रकल्प- 5.7 कोटी
करंजवण प्रकल्प -7.76 कोटी,
ओझरखेड प्रकल्प- 8.13 कोटी,
पालखेड प्रकल्प- 3.61 कोटी,
तिसगाव प्रकल्प -50.07 कोटी,
पुणेगाव प्रकल्प -12.5 कोटी

हेही वाचा :

Back to top button