पुणे जिल्ह्यात 303 कोटींच्या कामांना मंजुरी: चंद्रकांत पाटील म्हणतात दादा नाराज होणार नाहीत | पुढारी

पुणे जिल्ह्यात 303 कोटींच्या कामांना मंजुरी: चंद्रकांत पाटील म्हणतात दादा नाराज होणार नाहीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांना नवीन सरकार आल्यावर कात्री लागणार, अशी चर्चा सुरू होती. गुरुवारी (दि. 3) आराखड्यातील 303 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते. इतर सर्व आमदारांची कामे कमी करण्याची गरज नाही, असे सांगत अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील कामांना कात्री लावल्याचे सूतोवाच पाटील यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात 303 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

इतकी कात्री कामांना लावली नाही
कामाचे वाटप करताना भाजप आमदार, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातील आमदार नाराज होणार नाहीत, असा समतोल राखण्यात आला आहे. दादा अस्वस्थ होतील, रागावतील, नाराजी व्यक्त करतील, अशी कात्री त्यांच्या कामांना लावली नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली. नव्याने सरकार आल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना आवश्यक असलेली कामे आणि इतरांनीही सुचविलेली कामे घेता येतील, इतका निधी जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध आहे, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

Back to top button