राजगुरूनगर : कंपनीच्या स्क्रॅपसाठी दहशत; मजुरांवर दगडफेक करून मर्डर करण्याची धमकी | पुढारी

राजगुरूनगर : कंपनीच्या स्क्रॅपसाठी दहशत; मजुरांवर दगडफेक करून मर्डर करण्याची धमकी

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: कंपनीचे स्क्रॅप आपल्याला देत नसल्याने कंपनीत स्क्रॅप भरणाऱ्या मजुरांवर दगडफेक करून गेटवर वाहने लावुन पुढे कोणी आल्यास मर्डर करण्याची धमकी देण्याचा प्रकार खेड सेझमधील अॅट इंडीया प्रा. लि. निमगाव (ता. खेड) येथे घडला. विशेष म्हणजे कंपनीचे अधिकारी, सुरक्षा रक्षक यांच्या समोर स्क्रॅप भरणाऱ्या मजुरांवर संबंधित गुंडांनी दगडफेक करून काम बंद करायला भाग पाडले व सहकाऱ्यांना कंपनीच्या गेटवर बोलावुन घेत गाड्या लावुन कोणी पुढे आल्यास त्याचा मर्डर होईल अशी धमकी देत दहशत माजवली.

या प्रकाराविरोधात कंपनीचे अधिकारी सचिन वामनराव काटकर, (वय ३९, व्यवसाय नोकरी, रा. गुलमोहर पार्क, दत्तनगर, आंबेगाव (खु. पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नितीन पोपट तांबे, सदानंद पोपट तांबे, जयप्रकाश नारायण राउत, भरत अंकुश शिंदे (सर्व रा. निमगाव, ता. खेड) व इतर दोन जण अशा ६ जणांविरुद्ध दहशत निर्माण करून चोरी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

गुरुवारी (दि. ३) सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडलेल्या या दहशत व गुंडगिरीमुळे सेझमधील कंपनीच्या व्यवस्थापनांनी धसका घेतला असल्याचे मानले जात आहे. सेझमधील कंपन्यामध्ये ठेकेदारी व स्क्रॅप उचलण्यावरून दहशतीचे प्रकार वारंवार घडु लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी कनेरसरमध्ये कंपनीच्या परिसरात अशाच वादातून एकाचा निर्घृण खुन करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सहनिरीक्षक भारत भोसले यांनी सांगितले.

Back to top button