नाशिक : दाभाडीची कन्या महाराष्ट्र क्रिकेट संघात | पुढारी

नाशिक : दाभाडीची कन्या महाराष्ट्र क्रिकेट संघात

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
दाभाडीच्या लेकीने अवघ्या 16 व्या वर्षी 10 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात सहभागी होण्याची किमया साधली आहे. ज्ञानदा चेतन निकम असे तिचे नाव असून, नुकतीच ‘बीसीसीआय’च्या वूमन्स अंडर -19 स्पर्धेच्या फेरीअंतर्गत ती चंदीगडमधील सराव शिबिरातून परतली. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तिचा रविवारी (दि.30) सत्कार करण्यात आला. मालेगाव पंचक्रोशीतून अशाप्रकारे यश मिळविणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे.

प्राथमिक शिक्षक-शिक्षिका असलेले दीपा व चेतन निकम यांची ती कन्या आहे. खेळाविषयी आवड असलेल्या या कुटुंबाने ज्ञानदाला आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. एलव्हीएच विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणार्‍या ज्ञानदाने अनेक स्पर्धांमध्ये फटकेबाजी करीत मैदान गाजवलेय. विविध प्रशिक्षण क्लबच्या स्पर्धांमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिला थेट महाराष्ट्र संघात स्थान मिळाले. मालेगाव स्तरावर मुलींचा संघ नसल्याने तिने धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. अस्पायर अकॅडमीत तिने सराव केला. तन्वीर अहमद यांचे तिला मार्गदर्शन लाभले. ज्ञानदाचे पंचक्रोशीत सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

स्पर्धकांना प्रोत्साहन…
क्रीडाविश्वातील अवघड समजल्या जाणार्‍या आयर्न मॅन (ट्रायथलॉन) स्पर्धेत मालेगावचे तिघे सहभागी होत आहेत. डॉ. शशिकांत वाव्हळ, डॉ. अविनाश आहेर व अक्षय पाटील हे नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. खुल्या समुद्रात पोहणे या स्पर्धेतील सर्वांत अवघड टास्क असतो. त्यासाठी ते स्थानिक स्विमिंग पूलमध्ये सराव करत आहेत. क्रिकेटपटू निकमसह या स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले, अशी माहिती दीपक सावळे यांनी दिली.

हेही वाचा:

Back to top button