आदिवासींची ताई कुसुमताई कर्णिक यांचे निधन | पुढारी

आदिवासींची ताई कुसुमताई कर्णिक यांचे निधन

मंचर; पुढारी वृत्तसेवा:आंबेगाव, खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी गेली 42 वर्षे शासन दरबारी संघर्ष करून विविध प्रश्नांवर आदिवासींना न्याय देण्याचे काम करणार्‍या आदिवासींची ताई म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुसुमताई कर्णिक (वय 90) यांची प्राणज्योत पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने बुधवारी (दि. 2) दुपारी साडेचार वाजता मालवली. त्यामुळे आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या आदिवासी गावांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे वास्तव्य मंचर येथे होते. त्यांच्या मागे मुलगा सौरभ आनंद कर्णिक कपूर व सून कल्याणी सौरभ कर्णिक कपूर आहेत.

‘शाश्वत’ संस्थेच्या माध्यमातून आंबेगाव, खेड तालुक्यांत आदिवासी दुर्गम डोंगरी भागात त्या 1980 पासून काम करत होत्या. आदिवासींनी उत्पादित केलेल्या हिरड्याला बाजारभाव मिळवून देण्यासाठी, स्थानिकांसह आहुप्याची देवराई वाचवण्यासाठी त्यांनी लढा उभारला होता. सरकारच्या रोजगार हमी योजनेत ‘पडकई’चा समाविष्ट करण्यासाठीचे आंदोलन, हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) धरणग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी, आदिवासी, दलित, स्त्रियांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरुद्ध सातत्याने सत्याग्रह, आंदोलन करणार्‍या व अन्यायाला वाचा फोडणार्‍या दुर्गा अशी त्यांची ओळख होती.

“नर्मदा बचाव” आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासमवेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. आदिवासी मच्छीमार व्यावसायिकांना प्रशिक्षण व रोजगार, प्रौढ साक्षरता वर्ग त्यांनी सुरू केले होते. निवासी शाळा, दहा बालवाड्या व 25 अभ्यास वर्ग त्यांनी सुरू केले आहेत. आदिवासींची ताई या नावाने त्यांना ओळखले जात होते.

‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या संस्थेचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अत्यंत बुहमानाचा समजला जाणारा ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह’ हा पुरस्कार 2012 मध्ये ‘शाश्वत’ संस्थेला मिळाल्यानंतर आंबेगाव तालुक्याचे नाव सातासमुद्रापार गेले. कुसुमताई कर्णिक यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती मंचर येथील शाश्वत संस्थेच्या कार्यालयीन व्यवस्थापिका प्रतिभा तांबे व विश्वस्त सुलाताई गवारी यांनी दिली. ज्येष्ठ कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी यांच्यासह विविध मान्यवरांनी कुसुमताई कर्णिक यांनी केलेल्या कामाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई कर्णिक यांनी तब्बल 42 वर्षे अतिशय जिद्दीने व मेहनतीने काम केले आहे. आदिवासी समाजाबरोबर त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. शिक्षण, आरोग्य या क्षेत्राबरोबरच मच्छीमार व्यावसायिकांसाठी त्यांनी फार मोलाचे काम केले. आदिवासी कुटुंबातील एकही मुलगा, मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी जनजागृतीचे काम करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आदिवासी समाजाच्या हितासाठी त्यांनी केलेली आंदोलने यशस्वी ठरली. त्यांचे कार्य कायमस्वरूपी स्मरणात राहणारे आहे. कुसुमताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
                                         – दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री

Back to top button