नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट | पुढारी

नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
यंदा सर्वत्र अतिपर्जन्य झाले. पावसाळा संपुष्टात आला असला तरी नदी, नाले-ओढ्यांना पाणी प्रवाही आहे. या वाहून जाणार्‍या पाण्याचा योग्य विनियोग करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत मालेगाव उपविभागात तब्बल एक हजार 40 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यंदाच्या हंगामात पावसाळा चांगलाच लांबला. शिवाय, सातत्याने पर्जन्यवृष्टी होत राहिल्याने भूजल पातळी चांगलीच सुधारली असली तरी पाणी व्यवस्थापनाला पर्याय नाही. जेणेकरून उन्हाळ्यातही सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शक्य होईल. सद्य:स्थितीत उपविभागातील मालेगाव, सटाणा व नांदगाव या तीनही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. ओढे-नाल्यांमधील वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधकाम मोहीम कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वनराई बंधारा हा जमीनतळापासून 4 ते 5 फूट व नाल्याच्या रुंदीनुसार 10 ते 15 फूट लांब बांधण्यात येतो. त्यासाठी तीन थरांमध्ये 80 ते 100 गोणीची आवश्यकता असते. एक वनराई बंधार्‍याद्वारे 0.20 हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते. अशा वनराई बंधार्‍याच्या माध्यमातून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी सिमेंट व खतांच्या रिकाम्या गोणी, माती वाळूचा वापर करून पाण्याचा प्रवाह अडविण्यात येतो. त्याचा परिसरातील शेतकर्‍यांना लाभ होतो. चालू वर्षात मालेगाव तालुक्यात 380, बागलाण तालुक्यात 370 व नांदगाव तालुक्यात 290 असे 1 हजार 40 वनराई बंधारे डिसेंबरअखेर बांधण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथे स्थानिक गावकरी, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदानाने पाच वनराई बंधारे बांधून या मोहिमेचा शुभारंभ केल्याची माहिती तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांनी दिली.

उपविभागातील मालेगाव, बागलाण व नांदगाव तालुक्यातील शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी वनराई बंधारे बांधण्यासाठी कृषी विभागाने निश्चित केलेल्या जागी स्वयंस्फूर्तीने रिकाम्या गोण्या उपलब्ध करून या मोहिमेत सहभागी व्हावे. – दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी.

हेही वाचा:

Back to top button