राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एका व्यासपीठावर .. पाचव्यांदा भेट; नव्या समीकरणांची चर्चा | पुढारी

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एका व्यासपीठावर .. पाचव्यांदा भेट; नव्या समीकरणांची चर्चा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी एका मराठी चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने एकत्र आले. दोन महिन्यांच्या काळातील शिंदे-ठाकरे यांची ही पाचवी भेट ठरली आहे. विविध कारणांनी हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या गाठीभेटी राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार असल्याची चर्चा मात्र यानिमित्ताने सुरू झाली आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शुभारंभानिमित्त मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे हे बुधवारी एका व्यासपीठावर आले. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र म्हटले की शिवाजी महाराजांचे नाव येतेच. महेश मांजेकरांच्या या चित्रपटात वीर मराठे आहेत आणि ते ध्येयवेडे देखील आहेत. ध्येयवेडेच इतिहास घडवतात.

वेडात वीर मराठे दौडले 40

मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजकीय दौडीचा संदर्भ घेत राज यांनीही टोलेबाजी केली. ‘वेडात मराठे वीर दौडले 40’चे निर्माता, दिग्दर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख करत राज यांनी या कार्यक्रमातील आपल्या मनोगताला सुरुवात केली. त्यामुळे पुढील काळात दोन्ही नेत्यांच्या गाठीभेटी आणि एका व्यासपीठावर येण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्या जागी शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. या सरकारच्या शपथविधीनंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनासाठी पाठविलेल्या पत्राचीही मोठी चर्चा झाली होती. तेव्हापासून नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चा सुरू आहेत. मागील दोन महिन्यांत शिंदे-ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने बुधवारी पुन्हा एकदा शिंदे-ठाकरे एकत्र आले.

आम्ही देखील मागील साडे तीन महिन्यांपूर्वी एक दौड केली. कुठं कुठं गेलो माहिती नाही; मात्र आम्ही जनेतच्या मनातील इच्छा पूर्ण केली. राज ठाकरे आणि मी सतत एकत्र येतोय. मागच्या 10 वर्षांतील बॅकलॉग भरून काढत आहोत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

 

Back to top button