नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा बारा तासांत उलगडा | पुढारी

नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा बारा तासांत उलगडा

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
मेरी वसाहतीत झालेल्या कनिष्ठ लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यास पंचवटी पोलिसांना 12 तासांत यश आले आहे. या घटनेतील मृताच्या मावस काकानेच मद्यपानानंतर चार्जरने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित काकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने घटनेची कबुली दिली आहे. निवृत्ती हरी कोरडे (59 वर्षे, रा. लाखोटी मळा, इंदोरे, दिंडोरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित मावस काकाचे नाव आहे.

जलसंपदा विभागाच्या जलगती कार्यालयात कार्यरत संजय वसंतराव वायकंडे (38, रा. इमारत नंबर सी 4, मेरी कॉलनी, पंचवटी) यांची सोमवारी रात्री गळा दाबून हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले होते. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी मध्यरात्री अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 12 तासांत हत्येचा उलगडा करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. संशयित कोरडे हे शेतकरी असून, वायकंडे हा कोरडे यांच्याकडून वारंवार किरकोळ पैसे घेत असे. सोमवारी रात्री कोरडे हे घेवडा विक्रीसाठी पंचवटीतील मार्केट यार्डात आले होते. त्यानंतर दोघांचा एकमेकांशी संपर्क झाला. दरम्यान, वायकंडे यांची पत्नी लता व मुले दिवाळीसाठी बाहेरगावी गेल्याने दोघे मद्य घेऊन मेरी कॉलनीतील घरी आले. तेथे दोघांनी जेवण केल्यानंतर पुन्हा मद्यपान केले. काही वेळाने दोघांत पैशांच्या कारणातून वाद झाले. त्यावेळी वायकंडे यांनी कोरडे यांना लाथ मारली. त्यानंतर काही काळ दोघांमध्ये वाद झाल्यावर दोघे झोपी गेले असता, कोरडे याने मध्यरात्री वायकंडे यांची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर कोरडे झोपी गेले आणि सकाळी उठून दिंडोरीकडे रवाना झाले.

दरम्यान, पंचवटी पोलिसांनी तपास करून सीसीटीव्ही तपासले असता. त्यात कोरडे येताना व जाताना दिसले. संशयावरून त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सर्वच घटनाक्रम सांगत गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील करीत आहेत.

यांनी बजावली कामगिरी
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक युवराज पत्की, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ढमाळ, पंचवटी गुन्हे शोध पथक सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, प्रतीक पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुनील कासले व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी खुनाचा उलगडा केला.

‘अवघ्या 2000 रुपयांवरून वाद’
आरोपी निवृत्ती कोरडे याने मयत संजय वायकंडे यास 3 ते 4 महिन्यांपूर्वी दोन हजार रुपये दिलेले होते. त्याचीच वायकंडे यांच्याकडे मागणी केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर कोरडे याने वायकंडे हा झोपेत असताना मोबाइल चार्जिंगच्या वायरने गळा आवळून जीवे ठार मारले.

हेही वाचा :

Back to top button