खासगी प्रवासी वाहतुकीला कुणाचे अभय? चाकण पंचक्रोशीतील वाहनधारक त्रस्त | पुढारी

खासगी प्रवासी वाहतुकीला कुणाचे अभय? चाकण पंचक्रोशीतील वाहनधारक त्रस्त

चाकण; पुढारी वृत्तसेवा: चाकण पंचक्रोशीतील नागरिक अनेक दिवसांपासून दांडगाई करणार्‍या अवैध प्रवासी वाहतुकीने त्रस्त झाले आहेत. अर्थपूर्ण हितसंबंधांतून प्रशासनाचा यावर वचक नसल्यामुळे प्रशासनासमोरूनच ही अवैध प्रवासी वाहतूक होत असते. शिवाय महामार्गावरच उभ्या राहणार्‍या अशा वाहनांमुळे पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव व शिक्रापूर महामार्ग आणि या भागातील जिल्हा मार्गावर अपघात आणि वाहतुकीची कोंडीची समस्या सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीला नेमके कुणाचे अभय? असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

चाकण येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या नागरिकांना सातत्याने त्रस्त करीत आहे. वाहनांची वाढलेली संख्या, प्रवासी वाहतुकीची खासगी वाहने आणि रिक्षांची वाढलेली वर्दळ, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष, बेशिस्त वाहनचालक, अशा विविध कारणांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मात्र, थेट महामार्गावर रिक्षा उभ्या करून प्रवासी गोळा करण्याचे प्रकार आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आणि त्यांच्या आशीर्वादाने होणार्‍या कोंडीबाबत नागरिकांकडून तीव्र आक्षेप घेतले जात आहेत.

पीएमपीएमएलच्या बसगाड्या, एसटी ज्या ठिकाणाहून सुटते तेथेच खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने आणि रिक्षावाल्यांनी बेकायदा शिरकाव केला आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट प्रवाशांची बेकायदा वाहतूक सर्रास केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे अनेक युवती आणि महिलांना अशा अवैध वाहनातून प्रवास करण्यासाठी जबरदस्ती केली जाते. जबरदस्तीने त्यांना अनेकदा रस्ता अडवून वाहनात बसण्यास सांगितले जाते. सामान्य प्रवाशांना लुटल्याच्या आणि महिला युवतीच्या विनयभंग ते बलात्कार, अशा काही घटना मागील काही दिवसांत समोर आल्या आहेत.

Back to top button