नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न | पुढारी

नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या वर्षी दिवाळीमुळे नांदगाव आगारामध्ये 70 लाख रुपयांची कमाई झाल्याने गोडवा निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात कोराना ताळेबंदी, कर्मचारी वर्गाचा संप अशा समस्यांनी मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला होता. परंतू, यातुनही सुखरुप बाहेर पडून लालपरीने प्रवाशीवर्गाचा विश्वास जिंकला आहे.
यंदाच्या वर्षी ऐन दिवाळीतच महामंडळाकडून दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली. प्रवासी भाडेवाढीनंतर  प्रवाशांमध्ये घट होण्याची शक्यता होती. परंतु तरीही प्रवाशांनी खासगी बसेसकडे पाठ फिरवत लालपरीला पसंती दिली. भाडेवाढ होऊनही प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाला पसंती मिळाल्याचे दिसून आले. वेळापत्रकानुसार बसेसचे नियोजन असूनही वेळप्रसंगी बस गाड्यांची कमतरता भासल्याने बसस्थानकात बसेसचे आगमन होताच बसेस फुल्ल भरत असल्याने प्रवाशी दुसऱ्या बसची प्रतिक्षा करत होते. नांदगाव आगाराकुंड दिवाळी सणानिमित्त विभाग नियंत्रक शिया, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनातून दि. २१ ऑक्टोबर ते दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. नांदगाव आगाराच्या या वेळापत्रकाच्या नियोजनास प्रवाशांनी देखील जोरदार प्रतिसाद देत फक्त राज्य परिवहन मंहामंडळाच्या बसेसचा लाभ घेतला.
दिवाळीच्या सणात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही जादा बसेसचे नियोजन केले होते.  येथील आगारातील अधिकारी कर्मचारीवर्गाने देखील सणासुदीच्या कालावधीत खूप मेहनत घेतली. प्रवाशी वर्गास चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच बसनियोजन करून आगारास चांगला आर्थिक फायदा झाला आहे. – विश्वासराव गावीत, नांदगाव आगार व्यवस्थापक .
दिवाळी दरम्यान नांदगाव आगाराचे असे होते नियोजन
● बसेस संख्या – ४३
● फेऱ्या – २२००
● किमी – १७०१९६
● एकुण उत्पन्न – ७० लाख
● ७५ वय वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा प्रवाशी संख्या – १०३००

हेही वाचा:

Back to top button