ठाणे; पुढारी डेस्क : महामुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेत दररोज प्रवाशांची लुटमार होत असताना आता त्यात बुबा-बाबांची भर पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन या बुवा-बाबांनी वशीकरण, संसारात गोडवा आणणे, नोकरी, धंद्यात भरभराटी आणण्याच्या जाहिरातींचे स्टिकर रेल्वेत चिकटवले
आहेत. या स्टिकरद्वारे नागरिकांना लुटण्यासाठी जाळे रचले आहे.
रेल्वेत दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. दरडोही जीवनात अनेक नागरिक पिडलेले आहेत. प्रत्येकाच्या अडचणी काहीशा समान आहेत. या अडचणी जाणून बाबा-बुवांनी नागरिकांना चिंतामुक्त करण्याचे आमिष दाखवण्यासाठी रेल्वेची निवड केली आहे. प्रवाशांच्या नजरेस पडतील आशा प्रकारे देवदेवांच्या चित्रांचा
वापर करून नागरिकांना भुरळ पाडण्यासाठी जाहिरातबाजी करण्यात आली आहे.
या जाहिरातींमध्ये मोबाईल नंबर देण्यात आले असून घर बसल्या संकटमुक्त होण्याचे आमिष दाखवण्यात आले आहेत. या जाहिरातींना अनेक जण बळी पडण्यापूर्वी या बाबा-बुवांवर कारवाई केल्यास नागरिकांची भविष्यात
होणारी आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते.
रेल्वेने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. सकाळ-संध्याकाळच्या वेळी गर्दीत संधी साधत भुरटे चोर डल्ला मारत आहेत. गेल्या 48 तासात 74 प्रवाशांना चोरांनी टार्गेट केले. मोबाईल, बॅगा, सोन्याचा ऐवज, औषधांची गोणी व अन्य लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरांनी पळवला. या एकूण गुन्ह्यांपैकी केवळ दोनच गुन्ह्यांची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस चोरांची हिंमत वाढत असून ते दररोज प्रवाशांच्या मुद्देमालांवर डल्ला मारत आहेत.