कोंभळी : सीना धरणाच्या भरावावर झाडे - झुडपे; झुडपे वाढल्याने भीती वाढली | पुढारी

कोंभळी : सीना धरणाच्या भरावावर झाडे - झुडपे; झुडपे वाढल्याने भीती वाढली

कोंभळी; पुढारी वृत्तसेवा: कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण प्रकल्पाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे भरावाला तडे जाऊन धोका होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे सीना धरणाच्या भरावावरील झाडे-झुडपे तोडून साफसफाई करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व पर्यटकांनी केली आहे.

सीना धरणाची क्षमता दोन हजार 400 दशलक्ष घनफूट आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे धरण आहे. अहमदनगर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीला पूर आला होता. सीनेच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने व कुकडीच्या पाण्यामुळे सीना धरण भरले आहे. सीना धरणातीला पाण्यावर निमगाव गांगर्डा, मिरजगावसह 17 गावांची पाणी योजना अवलंबून आहे. त्यात मिरजगाव व श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या मोठ्या गावाच्या पाणी योजनांचा समावेश होतो. सीना धरणातून आष्टी तालुक्यातील मेहकरी पाणी प्रकल्पातही पाणी सोडण्यात येते, सीना धरणावर उजवा व डावा कालवा असल्याने हजारो हेक्टर शेतीची या पाण्यावर भिस्त आहे.

या प्रकल्पाच्या भरावावर छोटी-मोठी झाडे वाढली आहेत. तसेच छोटी मोठी झुडपेही आहेत. ही झाडे वाढत असल्याने त्यांची मुळे तलावाच्या भरावात जात असल्याने भरावाला तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रकल्पाच्या भरावावर झाडे झुडपे वाढत चालली आहेत. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सीना प्रकल्प गेली तीन चार वर्षे शंभर टक्के भरून वाहत आहे. जर ही झाडे-झुडपे वाढत राहिली तर प्रकल्पाच्या भरावावर तडे जाण्याची भीती नाकारता येत नाही. तीन तालुक्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरत असल्यामुळे संबंधितांनी तत्काळ लक्ष देऊन वाढलेल्या झाडा-झुडपांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.

पर्यटकांकडून नाराजी व्यक्त
नगर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे व कुकडीच्या पाण्यामुळे सीना धरण पूर्ण क्षमतेने भरून सीना नदी दुथडी भरून वाहत असल्याने दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे येत आहेत; मात्र धरणावर जाण्यासाठी असलेले गेट बंद आहे. या पर्यटकांना दुसर्‍या मार्गाने धरणावर जावे लागत आहे. तसेच, झाडे झुडपे वाढलेली असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

 

Back to top button