नाशिक : अद्यापही शिक्षकांची 3 हजार पदे रिक्तच | पुढारी

नाशिक : अद्यापही शिक्षकांची 3 हजार पदे रिक्तच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांची अंदाजित 3 हजार पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली असून, शासनस्तरावरून होत असलेल्या 75 हजार पदांच्या भरतीत या पदांचा समावेश असणार का ? असा प्रश्न पात्रताधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात एकूण 1350 शाळा असून, यापैकी 850 शाळा अनुदानित स्वरूपाच्या आहेत. या शाळांमध्ये ही 3 हजार पदे भरावयाची आहेत. या 3 हजार पदांपैकी अल्पसंख्याक शिक्षकांची एकूण 100 पदे रिक्त आहेत. राज्य शासनाकडून अल्पसंख्याकांच्या रिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे. यामुळे डीएडचे विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत, विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये 75 हजार पदे भरणार असल्याची घोषणा केली होती. घोषणेप्रमाणे पदभरतीच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. अल्पसंख्याक, अल्पभाषिक वगळता सर्व शाळांमध्ये पदे भरण्याची नितांत आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यात साधारणपणे 3 हजार माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त असून, प्राथमिक शिक्षकांचा आकडा वेगळाच आहे. शिक्षकांमधूनच मुख्याध्यापक निवडला जात असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक या पदाला त्वरित मान्यता देण्यात येते. मुख्याध्यापक रिटायर्ड झाल्यास त्या पदावर शिक्षक जातो. त्यामुळे शिक्षकाचे पद रिक्त होते आणि शिक्षक पदांची अडचण होत आहे. राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रक्रिया बंद करण्यात आली. मात्र, कालांतराने यातून शिक्षण विभागाला वगळण्यात आले होते. ज्या पदांच्या मान्यता प्रलंबित होत्या त्यांच्यावर सुनावणी घेऊन त्या पदांना मान्यता देण्याचे आदेश शासनस्तरावरून लागू
करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच भरती होण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागात अवघे तीन अधिकारी…
जिल्ह्यात शिक्षण विभागात केवळ 3 राजपत्रित अधिकारी कार्यरत आहेत. प्राथमिक, माध्यमिक, योजना यासाठी पूर्णवेळ 3 शिक्षणाधिकारी, 8 उपशिक्षणाधिकारी आणि 12 गटशिक्षणाधिकारी ही पदे रिक्त आहेत.

हेही वाचा:

Back to top button