खेड-मावळ सीमेवरील गावांमध्ये बिबट्याचा वावर | पुढारी

खेड-मावळ सीमेवरील गावांमध्ये बिबट्याचा वावर

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा: इंदोरी, नाणोली, नवलाख उंबरे, मंगरूळ, गोळेवाडी आणि निगडेपर्यंतच्या हद्दीत महिन्याभरापासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन परीमंडळ अधिकारी डी. एम. ढेमरे आणि वनरक्षक भारती भुजबळ यांनी दिली. इंदोरी, नाणोली, नवलाख उंबरे, मंगरुळ, गोळेवाडी आणि निगडे ही सहा गावे या खेड आणि मावळ या दोन तालुक्याच्या सीमेवरील हद्दीत येतात. या गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

त्याबाबत वनधिकार्‍यांनी सत्यता पडताळून पाहिली. यात त्यांनाही बिबट्या या सहा गावांमधून फिरत असल्याचे कळले. मात्र, या बिबट्याने जनावर किंवा माणसावर हल्ला केलेला नाही. रविवारी मंगरूळ येथील एका शेतकर्‍याच्या शेतात बिबट्या दिसला. त्यांनी दूरध्वनी करून आम्हाला कळविले. त्यानुसार आम्ही त्या शेतकर्‍याच्या शेतात गेलो. पण ते शेतकरी उपलब्ध न झाल्याने जास्त तपशील कळला नाही. मात्र, तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी तो बिबट्या पाहिल्याचे सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला…
मंगरूळजवळ गोळेवाडीला डोंगराच्या भागात काही ग्रामस्थांनी लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या कैद झाला आहे. हे महिन्यापूर्वीचे फुटेज तपासले तेव्हा एकच बिबट्या वेगवेगळ्या ठिकाणी दिसला, असे वन्य जीव रक्षक (मावळ) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी सांगितले.

Back to top button