सांगली : निवडणूक लांबणीवर; इच्छुकांचा जीव टांगणीवर | पुढारी

सांगली : निवडणूक लांबणीवर; इच्छुकांचा जीव टांगणीवर

कडेगाव;  संदीप पाटील :  कडेगाव तालुक्यातील 43 गावातील ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा निवडणुकीचा कार्यकाल नोव्हेंबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत या 43 गावात निवडणुकीचा धुरळा उडणार, हे निश्चित होते. परंतु मुदत संपणार्‍या गावात शासनाने प्रशासक नियुक्ती जाहीर केल्याने निवडणुका अजून काही दिवस तरी लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर तर इच्छुकांचा जीव टांगणीवर, अशीची अवस्था कार्यकर्त्यांची झाली आहे.

कडेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विकासकामांवरून आरोप – प्रत्यारोप झडू लागले आहेत. अनेकजणांनी न केलेल्या कामाचेही श्रेय घेऊन श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

थेट सरपंचपदामुळे इच्छुक कार्यकर्ते गावात अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी मिरवत आहेत. विरोधी गटातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढून पक्ष-प्रवेशाचे राजकारणही सुरू आहे. निवडणुकीला अजून काही दिवसाचा कालावधी आहे. मात्र तरीदेखील सध्या गावागावांत राजकीय कुरघोडींना वेग आला आहे.

काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी गट एकमेकांसमोर आमने-सामने येणार आहेत. थेट सरपंचपदामुळे निवडणुका चुरशीच्या होतील असे चित्र सध्या तरी आहे. तर या निमित्ताने पुन्हा एकदा गावागावांत राजकीय वातावरण ढवळून निघालेले पाहायला मिळणार आहे. यासाठी गावोगावच्या भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गावपातळीवर होणारी ही ग्रामपंचायतीची निवडणूक भावकी, पै-पाहुणे व मित्रमंडळी यांच्या संबंधावर होत असते. परिणामी, जिरवा – जिरवीचे व पाडापाडीचे राजकारण होते. या निवडणुकांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकींची गणिते अवलंबून असतात. त्यामुळे वरिष्ठ नेतेमंडळी सुद्धा या निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेऊन राहतात.

काँग्रेस, भाजपला गटबाजीचे ग्रहण

तालुक्यात काँग्रेस, भाजपला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. या पक्षांचे प्रत्येक गावात दोन-तीन गट कार्यरत आहेत. या गटांचे एकमेकांशी अजिबात जमत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हे गट पुन्हा सक्रिय झाले आहेत. ते नेत्यांना आपले राजकीय अस्तित्व दाखविण्याच्या तयारीत आहेत.

 

Back to top button