नाशिक : म्युनिसिपल सेनेचा वाद पोलिस दरबारी | पुढारी

नाशिक : म्युनिसिपल सेनेचा वाद पोलिस दरबारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
म्युनिसिपल कर्मचारी सेना कार्यालयासह अधिकृत संघटनेच्या अध्यक्षपदाचा वाद पोलिस दरबारी पोहोचला आहे. सोमवारी (दि.31) बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांची भेट घेत परस्परविरोधात दावे करून आम्हीच खरे असा जबाब लेखी पत्राद्वारे नोंदविला. दोन्ही गटांच्या वादात साडेचार हजार कर्मचार्‍यांची कोंडी झाली आहे. दरम्यान, म्युनिसिपल सेनेचा वाद औद्योगिक न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या आठवड्यात वसूबारसच्या मुहूर्तावर उद्धव गटाचे बडगुजर यांनी पालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख तिदमे यांनी मनपा आयुक्तांसह सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याची तक्रार केली. दोन्ही गटांच्या वादामुळे संबंधित कार्यालय सील करून सरकारवाडा पोलिसांनी हे प्रकरण सहायक पोलिस आयुक्तांकडे वर्ग केले. पोलिसांनी बडगुजर व तिदमे या दोघांना म्हणणे मांडण्याची नोटीस काढली. त्यानुसार दोघांनी जबाबात संघटना आपलीच असल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे, तिदमे यांनी कामगार उपआयुक्तांकडे धाव घेत बडगुजर यांनी संघटनेचे सदस्य नसतानाही नियमबाह्यपणे, बोगस मीटिंग दाखवून कर्मचार्‍यांच्या खोट्या सह्या करून अध्यक्षपद मिळवल्याची तक्रार केली. त्यावर दुय्यम निबंधकांनी एखादी व्यक्ती संघटनेची सभासद आहे की नाही, पदाधिकारी आहे की नाही याबाबत संघटना वादविवाद उच्च न्यायालय, मुंबई यांच्या औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या एका निकालाचा संदर्भ देत श्रमिक संघ अधिनियम 1926 च्या तरतुदीनुसार कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे आता हा वाद औद्योगिक न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

अध्यक्षपदावरून मला हटविण्याचा अधिकार केवळ सभासदांना असून, सभासद नसताना बडगुजर हे अध्यक्ष होऊच शकत आहे. अध्यक्ष नियुक्तीच्या सभेचा अजेंडा काढलेला नाही. 25 हजारांचे बोनस देण्याचे सांगून सभासदांकडून पाठिंब्याच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. हा प्रकार फौजदारी कारवाईस पात्र असून, तत्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे.
– प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना

युनिसिपल कर्मचारी सेनेला औद्योगिक न्यायालयाची मान्यता आहे. संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी प्रत्येकवेळी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. गेली पाच वर्षे तिदमे यांनी सर्वसाधारण सभा घेतलेली नाही. कर्मचार्‍यांचे प्रश्न सुटत नसल्यामुळेच नवीन अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती वैध असून, त्याबाबतची कागदपत्रे सादर करण्यात येईल.
– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

Back to top button