वाळकी : कांदा लिलाव बंद पाडले; संदेश कार्लेंचा शेतकर्‍यांसह ठिय्या, अचानक दर कोसळले | पुढारी

वाळकी : कांदा लिलाव बंद पाडले; संदेश कार्लेंचा शेतकर्‍यांसह ठिय्या, अचानक दर कोसळले

वाळकी; पुढारी वृत्तसेवा: राज्यभरात कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 31) लिलाव बंद पाडून दोन तास आंदोलन केले. अखेर माजी नगरसेवक निखिल वारे यांनी मध्यस्थी केल्याने दुपारनंतर कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू झाले तर कांद्याचे दरही वाढले. राज्यभरातच कांद्याला 3200 ते 3800 रुपये भाव मिळत असताना नगर बाजार समितीच्या नेप्ता उपबाजारात सोमवारी (दि. 31) सकाळी कांद्याच्या लिलाव प्रक्रियेस सुरुवात झाली.

यामध्ये काद्याला 1800 रुपये भाव निघाला. कांद्याचे बाजारभाव अचानक खाली आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आगपाखड करीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी तत्काळ लिलाव प्रक्रियेस विरोध करीत लिलाव बंद पाडले. व्यापारी आडते संगनमत करून बाजारभाव पाडत असल्याचे आरोप करत शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले. संदेश कार्ले म्हणाले, पारनेर व लासलगाव येथील बाजार समितीतील कांद्याला 3200 ते 3800 इतके भाव आहे. मात्र, नगर बाजार समितीत कांद्याला एक हजार 800 रुपये भाव काढला. तब्बल दोन तास शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू होते.

माजी नगरसेवक निखिल वारे यांनी या आंदोलनात मध्यस्थी करीत शेतकरी आणि व्यापारी, आडते यांच्यात समन्वय घडवून आणला. शेतकर्‍यांमधील संभ्रम दूर करीत त्यांची समजूत काढली. योग्य बाजारभाव मिळावा अशी शेतकर्‍यांची मागणी मान्य झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया दोन तासानंतर पूर्ववत सुरळीत सुरू झाली. त्यानंतर कांद्याला 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे भाव निघाले.

निखिल वारे म्हणाले, शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारींवर कांदा वाहतूक करणारे टेम्पोवाले यांना काही अडते कमिशन देतात, तसेच काही अडते स्वतः माल कमी भावात घेतात हे मान्य केले. त्यानंतर कमी भावात गेलेला कांदा शेतकर्‍यांना मान्य नसल्याने त्याची जबाबदारी मार्केट कमिटीने घ्यावी, अडत्याने स्वतः माल कमी भावाने घेऊ नये, तसेच अडत्याने कांदा वाहतूक करणार्‍या टेम्पोवाल्याना कमिशन देत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

यावेळी नगर तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट, संदीप जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव भिसे, कामगार प्रतिनिधी सचिन सातपुते, व्यापारी व हजारो शेतकरी वाहतूकदार उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनाला नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व पोलीस कर्मचार्‍यानी बंदोबस्त ठेवला.

आडते, व्यापार्‍यांकडून दरात संभ्रम
विशेष म्हणजे नेप्ती उपबाजारातीलच काही आडते, व्यापारी व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून कांद्याच्या बाजारभावाबाबत संभ्रम निर्माण करत असल्याची चर्चा होत आहे. आडतीवर आलेल्या एखाद्या 10-12 गोण्यांच्या वक्कलला सर्वाधिक बाजारभाव काढल्याचा मेसेज शेतकर्‍यांमध्ये पसरवला जातो. प्रत्यक्षातील लिलावात मात्र कमी बाजारभाव निघतो. त्यावेळी संभ्रम निर्माण होऊन गोंधळाचे वातावरण तयार होते. याबाबत बाजार समिती प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे.

कांदा व्यापारी व आडतदार संगनमत करून शेतकर्‍यांना लुटत आहेत. काही आडतदार स्वतः कमी भावात कांदा खरेदी करून व्यापार्‍यांना विकत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शेजारील बाजार समितीमध्ये कांद्याला 3800 रुपये भाव मिळत असताना नगर बाजार समितीत केवळ 1800 रुपये भाव देऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे.
                                       – संदेश कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य, नगर

Back to top button