नगर : 19 नोव्हेंबर पासून नगरकरांच्या सेवेत.: खा. सुजय विखे, आ. संग्राम जगतापांकडून पाहणी | पुढारी

नगर : 19 नोव्हेंबर पासून नगरकरांच्या सेवेत.: खा. सुजय विखे, आ. संग्राम जगतापांकडून पाहणी

नगर; पुढारी वृत्तसेवा: नगरकरांचे स्वप्न असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 19 नोव्हेंबर रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सोमवारी (दि.31) उड्डाणपुलावरून फेरफटका मारून उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उड्डाणपूल प्रशासनाला दिले.

उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या 19 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे यांनी दिली. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, नगरकरांची एक स्वप्नपूर्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी व नगर शहरातील नागरिकांचे आभार व्यक्त करतो. मागील दोन वर्षांत अनेक अपघात झाले.

मात्र, नगरकरांनी सहकार्याची भूमिका घेतली. नितीन गडकरी यांच्या हस्ते 19 नोव्हेंबरला या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबरपासून नगरकरांसाठी हा उड्डाणपूल खुला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच उद्घाटन सोहळ्याच्या नियोजनासाठी देखील काही सूचना खा.विखेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी आशिष असाटी, उप कार्यकारी अभियंता प्रफुल्ल दिवाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बसस्थानक मोकळा श्वास घेणार
पुणे-औरंगाबाद रस्ता नगर शहरातून जात असल्याने कोठी, मार्केटयार्ड चौक, माळीवाडा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुणे बसस्थानक, स्वस्तिक चौक आणि यश पॅलेस चौक आदी परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. आता उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने परिसरातील वाहतूक कोंडीला लगाम बसणार आहे.

शहराचा मानबिंदू ठरेल : आ. जगताप
नगरकरांचे स्वप्न असलेला हा उड्डाणपूल शहराचा मानबिंदू ठरेल, अशी भावना आमदार संग्राम जगताम यांनी व्यक्त केली. उद्घाटनानंतर नगरकांना या उड्डाणपुलावरून ये-जा करता येणार आहे. उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button