Dada Bhuse : जे काही सगळे वाईट झाले, ते तीन महिन्यांतच झाले का? | पुढारी

Dada Bhuse : जे काही सगळे वाईट झाले, ते तीन महिन्यांतच झाले का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याबाहेर गेलेल्या विविध प्रकल्पांबाबत उद्योगमंत्र्यांनी खुलासा केला असून, याप्रश्नी वारंवार खोटे बोलणे योग्य नाही, असा टोला राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी विरोधकांना लगावला. हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे विषय काही 1 किंवा 2 दिवसांचे नसतात, असे सांगताना, जे काही सगळे वाईट झाले, ते तीन महिन्यांतच झाले का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या ना. भुसे यांनी सोमवारी (दि. 31) पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्याकडे ना. भुसे यांचे लक्ष वेधले असता, याबाबत उद्योगमंत्र्यांनी खुलासा केला आहे. हा राजकीय विषय नसून, जनता सर्व जाणते आहे. त्यामुळे या विषयावरून सातत्याने खोटे बोलणे योग्य नाही, असा टोला ना. भुसे यांनी विरोधकांना लगावला. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही खोकेवाले नव्हतो. पण, आता दिसतो, अशी उद्विग्नता व्यक्त करताना, आमच्या गटात कोणीही नाराज नसल्याचे ना. भुसे यांनी स्पष्ट केले. आमदार बच्चू कडू आणि आ. राणांच्या बाबतीतले गैरसमज दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशभरातील 50 ठिकाणी उडान योजना राबविण्यात आली होती. स्थानिक पातळीवर विमानसेवेला चालना देण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती. तिचा कालावधी 3 वर्षांचा होता. मात्र, कोरोनामुळे त्याला एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली असून ती संपुष्टात आली. त्यामुळे योजनेला मुदतवाढ देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी कंपन्यांशी चर्चा करण्याची ग्वाही ना. भुसे यांनी दिली. कांद्याच्या चौकशीबाबत काही वरिष्ठ अधिकार्‍यांवर जबाबदारी देण्यात आल्याचे ना. भुसेंनी सांगितले.

… तर टोल बंदबाबत चर्चा करणार
नाशिक – मुंबई महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सूचना केल्या आहेत. मात्र, पावसामुळे काम खोळंबले होते. आता पावसाळा संपला असून, महामार्गावरील खड्ड्यांबाबत ठेकेदाराला कडक सूचना केल्या आहेत. विहित मुदतीत जर डागडुजी झाली नाही, तर टोल बंद करण्याबाबत थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन ना. भुसे यांनी दिले.

हेही वाचा :

Back to top button