

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना देखील काही पोलिस कर्मचार्यांना मात्र टेम्पो आणि क्रेनवरील 'अर्थ'पूर्ण कर्तव्याचा मोह काही केल्याने सुटताना दिसत नाही. वाहतूक नियमनाचे कर्तव्य दिले, की कारणांची जंत्रीच वाचून हे कर्मचारी आपली सुटका करवून घेतात. महिला कर्मचारी देखील त्यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे अशा कर्मचार्यांच्या वर्तणुकीची दखल वरिष्ठ कधी घेणार, हा प्रश्न आहे.
वाहतूक विभागाचा कारभार गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. बदली झाल्यानंतर मलईदार विभाग मिळविण्यासाठी करावे लागणारे लक्ष्मीदर्शन ते कंट्रोलला जमा केल्यानंतर परतीच्या मार्गासाठी द्यावी लागेली रसद, अशा नानाविध चर्चा या विभागाबाबत सध्या सुरू आहेत.
मात्र, अनेकदा समज दिल्यानंतर देखील त्यांच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्याने अतिवरिष्ठांनी या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेत नवा बदल केला. आदेशाची अंमलबजावणी होताच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. थेट कडक शिस्तीचे धोरण अवलंबणार्या महिला अधिकार्याकडे वाहतूक विभागावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आल्यामुळे दररोज अर्थपूर्ण काम करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
वाहतूक विभागात बदली झाल्यानंतर चांगला विभाग मिळविण्यापासून ते क्रेन, टेम्पोवरील कर्तव्य घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. अनेक कर्मचारी तर एवढे निर्ढावलेले आहेत, की केले तर टेम्पो आणि क्रेनचेच कर्तव्य; अन्यथा सुटी, असा जणू त्यांनी पायंडाच पाडला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील एका वाहतूक विभागात तर काही कर्मचारी तेथील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून गेल्यानंतर परत तेथेच बदली करून आले आहेत.
बदलीपूर्वी पाच ते सहा महिन्यांचा कार्यकाळ पोलिस ठाणे किंवा इतर शाखांत काढलेले कर्मचारीही आहेत. पूर्वी येथे काम केल्यामुळे त्यांना कोणत्या ठिकाणी कशी कारवाई केली जाते, याची माहिती आहे. पूर्वी हे कर्मचारी येथे काम करीत असताना क्रेन आणि टेम्पोचेच काम करीत होते आणि आता परत येथे बदलून आल्यानंतर त्यांना क्रेन आणि टेम्पोचेच काम करण्यात रस असतो. प्रत्येकाला आठ दिवसांची 'टर्म' दिली जाते.
आठ दिवस हे कर्मचारी तहान-भूक विसरून आपले कर्तव्य चोख पार पाडतात. दिवसा जेवणाची देखील तसदी ते घेत नाहीत. शिवाय आठवड्यात सुटी आली तर पुढील कर्तव्य वाढवून मागितले जाते. त्यांना इतर कर्तव्ये का दिली जात नाहीत, असा देखील सवाल आहे. वाहतुकीचे नियमन हे वाहतूक पोलिसांचे पहिले कर्तव्य आहे. मात्र, असे असताना देखील हे कर्मचारी नियमन सोडून इतर कर्तव्याला प्राधान्य देतात. त्यांना जर दैनंदिन वाहतूक नियमनाचे काम दिले, तर टाळाटाळ करतात, अशी माहिती सूत्रांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना दिली.
टेम्पो, क्रेनचे गणित गोलमाल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक टेम्पो आणि क्रेनवरील पोलिस कर्मचार्यापासून ते तेथे काम करणार्या कामगारांना दिवसाचे टार्गेट दिले जाते. दिवसाकाठी 35 पावत्या करण्याचे टार्गेट असते. मात्र, लक्ष्मीदर्शनाच्या मोहापायी हे कर्मचारी न दमता, न थकता सत्तरपर्यंतचा टप्पा गाठतात. त्यातील अर्ध्या वाहनचालकांना दंडाच्या दराचा आकडा वाढवून प्रत्येक आठवड्याला मोठी मजल मारतात. दंड मोठा असल्यामुळे वाहनचालक देखील सहज चिरीमिरी देण्यासाठी तयार होतो, तर क्रेनबाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक गाडी क्रेनवाल्याकडून उचलून विभागात जमा केली जात नाही.
ठरावीक गाड्या उचलल्यानंतर काही गाड्यांना जामर लावून तेथेच ठेवले जाते. तेथे विभागाचा किंवा संबंधित कर्मचार्याचा संपर्क क्रमांक दिलेला असतो. वरिष्ठ अधिकार्यांनी प्रत्येक उचललेल्या गाडीची नोंद रजिस्टर व क्रेन टेम्पोच्या कॅमेर्यात करण्यास सांगितले आहे. मात्र, असे असताना देखील चलाखी करून हे कर्मचारी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला हरताळ फासून 'अर्थ'पूर्ण कर्तव्य चोख निभावतात. त्यामुळे काही कर्मचार्यांचीच वाहतूक आणि टेम्पो व क्रेनच्या कामावर मक्तेदारी निर्माण झाल्याचे सध्या वाहतूक विभागातील चित्र आहे.
'त्या' चौकडीची उचलबांगडी…
वाहतूक विभागात मोलाचे कर्तव्य पार पाडणार्या त्या चौघा कर्मचार्यांची थेट वाहतूक विभागातून उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना कर्तव्यासाठी पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी वाहतूक विभगातील सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची गांभीर्याने दखल घेत कर्तव्य सोडून भलतेच काम करणार्यांना दणका दिला आहे. बदली करण्यात आलेल्या चौघा कर्मचार्यांवर विशिष्ट प्रकारची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा होती.
त्यातील एक जण डीओ (कर्तव्य वाटप करणारा अधिकारी), दुसरा डीओ मदतनीस तर तिसरा ऑपरेटर आहे. ऑपरेटरचा लष्कर वाहतूक विभागातील कारनामा चांगलाच गाजला होता. तेथील पोलिस निरीक्षकाने थेट सह पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज करून व्यथा मांडली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेकडे त्याची चौकशी देण्यात आली होती. त्यानंतर आता या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्याप्रकारे या कर्मचार्यांची उचलबांगडी करण्यात आली, तशाच प्रकरे पाच वर्षांचा कालावधी संपवून आल्यानंतरही दुसर्यांदा त्याच विभागात काम करणार्या कर्मचार्यांची उचलबांगडी करण्याची गरज असल्याचे दिसून येते.