कोथरूडच्या येनपुरे टोळीवर मोक्का | पुढारी

कोथरूडच्या येनपुरे टोळीवर मोक्का

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोथरूडमधील केळेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सागर ऊर्फ मांडी येनपुरे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे, साहिल विनायक जगताप, अक्षय दामू वाळुंज, सुरेश कालीदास वाजे, वैभव ऊर्फ भोर्‍या प्रदीप जगताप (सर्व रा. केळेवाडी, पौड रस्ता, कोथरूड) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.

येनपुरे, त्याचे साथीदार, जगताप, वाळुंज, वाजे यांनी पौड रस्त्यावरील केळेवाडी परिसरात दहशत माजविली होती. त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. येनपुरे टोळीच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर आरोपींच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक तानाजी पांढरे, प्रवीण कुलकर्णी, अजय सावंत यांनी मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला.

संबंधित प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आला. प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस आयुुक्तांनी येनपुरे टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. गेल्या दीड वर्षात शहर परिसरातील 104 गुंड टोळ्यांच्या विरोधात पोलिस आयुक्तांच्या आदेशाने मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button