नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई ! | पुढारी

नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई !

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा
पावसाने उघडीप दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बळीराजा भात कापणीच्या कामात व्यस्त झाला आहे. परतीच्या पावसामुळे बहुतांश पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहरी पावसाचा भरवसा नसल्याने देवगांव परिसरातील शेतकरीवर्गाची भात कापणीची हातघाई सुरू झाली आहे.
यंदा खरीप हंगामाच्या वेळेनुसार सुरू झालेला पाऊस वेळेपेक्षा अधिक काळ म्हणजेच हळवे पीक काढणीला तयार झाल्यानंतरही निमगरवे पीक होईपर्यंत अगदी ऑक्टोबरच्या मध्यनंतरही सुरूच होता. दरसाल नवरात्रीपूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीच्या सुरवातीपर्यंत जोरदार सुरूच होता. दिवाळीपूर्वी पाऊस थांबला. वर्षातील महत्वपूर्ण असलेला दिवाळसण आणि भाऊबीजमुळे भातशेतीत तयार झालेल्या पिकांच्या कापण्या खोळंबल्या होत्या. त्यात पावसाने उघडीप दिली व सणवारही संपल्याने खोळंबलेल्या कापण्या उरकण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. भाऊबीज उरकताच मजुरांची शोधाशोध करून कापण्यांना जोरदार प्रारंभ झाला आहे. अशा भात कापण्यांची लगबग तालुकाभर दिसून येत आहे.
परतीच्या पावसात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून महाग झालेली बियाणे, औषधे, वाढलेले मजुरीचे दर, अतिवृष्टी, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना तोंड देऊन वाचलेले व काढणीला आलेले भातपीक कापणीला व झोडणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरीवर्ग दिवाळी सणानंतर शेतीकामात व्यस्त असून देवगांव परिसरात भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. यंदा खरिपातील ९० दिवसांचे हळवे पीक केव्हाच काढणीला तयार झाले होते. मात्र पाऊस असल्याने जर कापणी केली तर ते भिजून नष्ट होईल या भीतीने शेतात पिकांची पेंड्या उभेच ठेवण्यात शेतकऱ्यांनी शहाणपण दाखवले. हीच स्थिती निमगरवे पीक जे १०० ते ११० दिवसांच्या बाबतीत ही शेतकऱ्यांनी अंगिकारली. तर १२० ते १४० दिवसांचे गर पौक तेही त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा ५ ते १५ दिवसांनंतर कापण्यात येत आहे. यामध्ये एकूण आणेवारीत हळव्या भाताला पावसाचा जास्त फटका बसला असून निमगरव्या भातावरही कमी अधिक प्रमाणात उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी आणि चिखल असल्याने शेतकऱ्यांना कापणीच्या शेताबाहेर ठेवण्यायोग्य जागेत सुकविण्यासाठी आटापिटा करावा लागतो आहे. तर तयार झालेले पीक जर वेळेशिवाय काढले तर पीक अति परिपक्कवतेमुळे गळून जाण्याची भीती वाटत असल्याने अनेक ठिकाणी दिवाळीच्या सणात हळव्या कापण्या सुरू होत्या. एकंदरीत त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वत्र कापणी हंगामाची लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दिवाळी संपताच भात कापणीला सुरुवात…
परतीच्या पावसामुळे भातशेतीत पाणी तुंबून राहिले होते, तसेच काही ठिकाणी भाताची तयार रोपेही कुजली होती. या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग हताश झाला होता. अखेर आहे त्या परिस्थितीत दिवाळी सणाचा उत्सव साजरा करून जे मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी वर्ग संकटाला समोरा जाऊन पुन्हा सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र भातशेती कापणी व झोडणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.

हेही वाचा:

Back to top button