सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात दर्शनावेळी भाविकांना धक्काबुक्की | पुढारी

सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात दर्शनावेळी भाविकांना धक्काबुक्की

सप्तशृंगीगड : प्रतिनिधी :

दिवाळी पाडव्याचा मुहूर्त व दिवाळी सुट्टीची पर्वणी साधत भाविकांनी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. प्रेम से बोलो जय मातादी, अंबा माता की जय जय मातादी च्या जय घोषणाने गड दुमदुमून गेला आहे.  गुजरात, जळगाव, मुंबई, धुळे, पुणे, इंदोर, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणच्या भाविकांचा गडावर महापूर पाहावयास मिळत आहे. मात्र, मंदिरात जागेचा अभाव असल्याने भाविकांची गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  येथील सुरक्षारक्षक व सेवेकरी यांच्याकडून भाविकांना धक्काबुकी होत असल्याचा आरोप काही भाविकांनी केला आहे.

भाविकांना देवीचे दर्शन न घेताच गाभाऱ्यातून धक्के देऊन बाहेर काढले जात असल्याचा व अरेरावीची भाषा   अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप काही भाविकांनी केला आहे. मंदिरात एकाच रांगेतून  महिला -पुरुष, वयोवृद्ध व लहान मुलांना सोडत असल्याने प्रचंड गर्दी होत असून भाविकांना सुरक्षारक्षक व सेवेकरी यांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही ट्रस्ट फक्त बघ्याची भूमिका पार पाडताना दिसत असल्याने मंदिरात योग्य ते नियोजन करणे गरजेचे असल्याचे भाविकांकडून बोलले जात आहे.

गर्दीचा फायदा घेत चोर देखील आपला डाव साधत आहेत. अनेक भाविकांचे महागडे मोबाईल, पाकिटे, सोन्याची चैन, मंगळसूत्र चोरीला गेले आहेत. तसेच एसटी महामंडळाच्या नियोजन शून्यते मुळे सप्तशृंगी गडावर भाविकांचे प्रचंड हाल होत आहे.

एसटी बसेस कमी असल्याने व नाशिकला जाण्यासाठी सायंकाळी साडेपाच ची शेवटची बस असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. साडेपाच नंतर नांदुरी ला जाण्यासाठी बसच उपलब्ध नसल्याने खाजगी वाहतूकदारांची चंगळ होत आहे. अव्वाचे सव्वा भाडे आकारून भाविकांची अक्षरशः लूट केली जात आहे. ट्रस्टने बांधलेले भक्तनिवास फुल झाल्याने इतर भाविकांचे हाल झाले. अनेकांना नांदुरी वनी येथे मुक्कामी राहावे लागले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी ट्रस्टकडून टप्प्याटप्प्याने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  वाहने पार करायला जागा नसल्यामुळे शेतात व जिथे जागा मिळेल तिथे आपली वाहने लावत होते. रोपवे गेटच्या समोर येथील दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पाच किलोमीटर दूर वाहने पार्क करून भाविक पायी देवी दर्शनासाठी येत होते.  रोपवे ट्रॉलीलाही गर्दी वाढल्याने तेथेही चार ते पाच तास वेटिंग असल्याने भाविकांनी पायऱ्या चढून देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे चार ते पाच दिवसांपासून एकच गर्दी होत असून गर्दीचा ओघ वाढत आहे. त्यामुळे भाविक गर्दीचा अंदाज घेऊन मंदिरात न जाता पहिल्या पायरीचे दर्शन घेत माघारी फिरले. एकीकडे गावाच्या बाहेर रोप वे असल्याने भाविकभक्त गावामध्ये येत नसल्याने देवी संस्थानच्या देणगीवर ही परिणाम झाला आहे.

आम्ही दरवर्षी कल्याण येथून आई भगवती चे दर्शन घेण्यासाठी गडावरती येत असतो. आज प्रचंड गर्दी होती. येथील सुरक्षारक्षक व सेवेकरी याच्याकडून देवीचे दर्शन घेण्याआधीच हाताला धरून ढकलून दिले जात आहे. ट्रस्टचे नियोजन नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चेतन आहिरे, कल्याण

गडावर भाविकांची गर्दी होत आहे.  देवी ट्रस्ट सुलभ दर्शन होण्यासाठी रोप वे चे सुविधा उपलब्ध करून देत आहे. परंतु पायरीने मंदिरात जाणा-या भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. भाविकांची गैरसोय होत असून यासाठी देवी संस्थान ने भाविकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परंतु संस्थान व विश्वस्त मंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

प्रकाश कडवे, शहर अध्यक्ष भाजपा सप्तशृंगगड

Back to top button