मंचर : अवैध दारू विक्री बंदचा निर्णय घेतल्याने पोलिसांकडून सत्कार | पुढारी

मंचर : अवैध दारू विक्री बंदचा निर्णय घेतल्याने पोलिसांकडून सत्कार

मंचर; पुढारी वृत्तसेवा: पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे अनेक वर्षांपासून दारू विक्री करणार्‍या विक्रेत्याने यापुढे दारू विक्री करणार नाही, अशी शपथ घेतली. त्याबद्दल मंचर पोलिसांनी त्याचा पोलिस ठाण्यात शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
पिंपळगाव येथील गजानन आबाजी पोखरकर ही व्यक्ती गावात अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची विक्री करत होती. याबाबत मंचर पोलिसांना अनेकदा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

याबाबत मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर, पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे हे पोखरकर यांना वारंवार सांगून मतपरिवर्तन करत होते. अखेर गजानन पोखरकर यांचे मत परिवर्तन करण्यात पोलिसांना यश आले. पोखरकर यांनी अवैध दारू विक्रीचा धंदा पूर्णपणे बंद केला असून, त्यांच्याजवळ असलेल्या देशी- विदेशी दारूच्या बाटल्यांचे विसर्जन केले. यापुढे दारू विक्री करणार नाही, अशी शपथ घेतली आहे. मंचर पोलिसांनीही पोखरकरांच्या निर्णयाचे कौतुक करत मंचर पोलिस ठाण्यात शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

Back to top button