नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित | पुढारी

नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावात दूषित पाण्याच्या वापरामुळे सुमारे 30 ते 35 पुरुष, महिला व लहान मुलांना जुलाब व उलट्यांचा त्रास झाल्याने या रुग्णांना उपचारासाठी इगतपुरीचे ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आमदार हिरामण खोसकर यांनी फांगुळगव्हाण गावाला तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता, वैद्यकीय अधिकारीच हजर नसल्याने आमदार संतप्त झाले. खोसकर यांनी, उपचारात हयगय करता कामा नये, अशा कडक सूचना उपस्थित डॉक्टरांना दिल्या. अशा प्रकारची घटना होण्याची ही तिसरी वेळ असून, गत महिन्यात तालुक्यातील तारांगणपाडा येथेही 50 ते 60 नागरिकांना दूषित पाण्यामुळे त्रास होऊन एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. फांगुळगव्हाण येथे पिण्याच्या पाण्यात पावडरचे प्रमाण अधिक झाल्यामुळेच उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला असून, येथे रुजू असलेले प्रशासक, ग्रामसेवक यांच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक हानीही पोहोचत असल्याचा दावा रहिवाशांनी केला. दरम्यान, याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा परिषदेने लक्ष घालावे, अशी मागणी आमदार खोसकर करणार आहेत, तर यातील काही गंभीर रुग्णांना घोटी येथील खासगी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा खोसकर यांनी यावेळी दिला.

हेही वाचा:

Back to top button