श्री बाबीर देवस्थानसाठी निधी कमी पडू देणार नाही: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे | पुढारी

श्री बाबीर देवस्थानसाठी निधी कमी पडू देणार नाही: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रासह इंदापूर तालुक्यातील जनतेचे श्रध्दास्थान असलेले रुई (ता. इंदापूर) येथील श्री बाबीरबुवा देवस्थान हे प्रेरणास्थान असून, या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी निधी दिला आहे. यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाबीरभक्तांना व रुई ग्रामस्थांना दिली.

रुई येथील श्री बाबीरबुवा देवाच्या यात्रेच्या मुख्य दिवशी (दि. 27) माजी राज्यमंत्री भरणे यांनी श्री बाबीरदेवाचे दर्शन घेतले. या वेळी राज्यातील शेतकर्‍यांना व जनतेला सुखसमृद्धी मिळू दे, असे साकडे घातले. भरणे म्हणाले की, बाबीरदेवाच्या मंदिर परिसराच्या विकासासाठी तसेच देवस्थानकडे येणार्‍या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच, 2515 योजनेअंतर्गत 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यास स्थगिती आहे.

स्थगिती उठताच 75 लाख व सहभागातून जवळपास 2 कोटींचा निधी उभारून मंदिर व परिसराचा कायापालट केला जाईल. आम्ही नुसतेच बोलत नाही, तर करून दाखवतो. यापूर्वी केलेले देखील आहे, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे यांच्या वतीने आयोजित गजढोल स्पर्धेत सहभाग घेऊन ढोल वाजवून श्री बाबीरदेवाच्या यात्रेचा आनंद घेतला.

 

Back to top button