Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार | पुढारी

Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात महम्मद रहीम महम्मद कयामुद्दीन (रा. पश्चिम बंगाल) यांचा मृत्यू झाला आहे. शबनम हसन शेख (रा. बोरगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ 17 ऑक्टोबरला सायंकाळी 4 च्या सुमारास संतोष नर्सरीसमोरून पायी जात असताना नाशिकहून ओझरच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरून उलट दिशेने दुचाकीस्वार आला. दुचाकीस्वाराने धडक दिल्याने कयामुद्दीन गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान, 23 ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत. तर दुसरा अपघात पांडवलेणे ते पाथर्डी फाट्यादरम्यान झाला. या अपघातात हिरामण बबन पोरजे (57, रा. वडनेर दुमाला) यांचा मृत्यू झाला. हिरामण पोरजे हे 28 ऑक्टोबरला दुपारी 3.15 च्या सुमारास एमएच 15, डीडब्ल्यू 9946 क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या घंटागाडीने पोरजे यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने पोरजे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घंटागाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसर्‍या घटनेत मंगराज लक्ष्मणदास जैसवाणी (68, रा. शरणपूर रोड) यांना इंदिरानगरहून घराकडे येत असताना अज्ञात कारची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. जैसवानी हे त्यांच्या दुचाकीवरून घराकडे येत असताना हा अपघात झाला होता. त्यात त्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.28) रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठक्कर बाजार येथे एकास मारहाण : वाहन नीट चालव असे बोलल्याचा राग आल्याने दोघांनी मिळून एकास मारहाण केल्याची घटना ठक्कर बाजार परिसराजवळ घडली. विशाल बाबासाहेब बांगर (24, रा. संत कबीरनगर) हे गुरुवारी (दि.27) रात्री नातलगांसह जात असताना संशयितांनी दुचाकीने त्यांना कट मारला. त्यामुळे विशाल यांनी त्यांना वाहन नीट चालवण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने संशयित मुशरफ अन्सारी व आशिष भंडारी या दोघांनी विशालला मारहाण करीत कोयत्याने वार करून दुखापत केली.

देवळाली कॅम्पला घरफोडी : घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख 36 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार देवळाली कॅम्प येथील धोंडी रोड परिसरात घडला. रोहिग्टंन फरदीन देवळालीवाला (77) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी 26 ऑक्टोबरला सायंकाळी 7 च्या सुमारास घरफोडी करून घरातील सुमारे आठ तोळे वजनाचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंचावरून पडल्याने एकाचा मृत्यू : उंचावरून पडल्याने 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी गावात घडली. केशव जगन्नाथ चंद्रकोर (57, रा. पाथर्डी गाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव चंद्रकोर हे बांधकाम साइटवर असताना शुक्रवारी (दि.28) उंचावरून पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपनगरला वृद्धेची पोत खेचली : नाशिकरोड : उपनगरच्या मातोश्रीनगर येथे पादचारी वृद्धेची चार तोळे वजनाची सुमारे एक लाख 20 हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी खेचून नेली. शांताबाई रोकडे या आपल्या पतीसोबत उपनगर येथील जलाराम अपार्टमेंटसमोरील महापालिका गार्डननजीक जात होत्या. त्यावेळी शांती पार्क रोडमार्गे पल्सरवरून आलेल्या दोन चोरट्यांनी शांताबाई यांच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत खेचली आणि पसार झाले. चोरटे महाराष्ट्र हायस्कूलच्या दिशेने वेगाने फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी रोकडे दांपत्याने आरडाओरड केला. परंतु, चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले. शांताबाई रोकडे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा:

Back to top button