पिंपरी : …तर होईल दंडाची कारवाई | पुढारी

पिंपरी : ...तर होईल दंडाची कारवाई

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: वाहनांच्या काचा या पारदर्शक असाव्यात, असे वाहतूक नियमांगतर्गत पोलिसांकडून सांगण्यात येते; मात्र या नियमाला बगल देत काही वाहनचालक आपल्या चारचाकी वाहनाच्या काचांना गडद काळ्या रंगाच्या फिल्म लावतात. नियमभंग करणार्‍या वाहन चालकांकडून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मागील दहा महिन्यात तब्बल दोन कोटी 31 लाख 13 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.

वाहतूक पोलिसांनी 23 हजार 944 वाहनांवर कारवाई केली. शुक्रवारी (दि.28) विशेष मोहीम राबवून 422 वाहनांवर कारवाई करत तीन लाख 48 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, जानेवारी महिन्यापासून वाहनाला काळ्या काचा, फिल्म लावणार्‍या वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. काळ्या काचा लावल्याने आपली प्रतिष्ठा वाढत असल्याचा गैरसमज देखील काही वाहनचालकांमध्ये असतो. या गैरसमजातून देखील ते नियमभंग करत असल्याचे दिसून येते

भोसरीत सर्वाधिक कारवाई
शुक्रवारी वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये भोसरी वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक 100 वाहनांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांकडून तब्बल 79 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहनांना काळ्या काचांचा वापर करून अनेक गैर कृत्य होत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे या काचा लावणे बेकादेशीर आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. त्यामुळे अपघात आणि गुन्हेगारी कृत्याला आळा बसेल.

                 – आनंद भोईटे, पोलिस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पिं.चिं.शहर.

शुक्रवारी (दि.28) करण्यात आलेली कारवाई
वाहतूक विभाग प्रकरणे दंड (रुपयांमध्ये)
सांगवी 49 39600
हिंजवडी 27 17500
निगडी 30 26000
चिंचवड 19 16500
पिंपरी 19 17500
भोसरी 100 79000
चाकण 38 29000
देहुरोड 45 42500
दिघी आळंदी 11 8500
तळवडे 21 16500
वाकड 28 26500
तळेगाव 17 17500
म्हाळुंगे 18 12000
बावधन निरंक निरंक
एकूण 422 348600

Back to top button