नाशिक : दिवाळीनिमित्त सप्तशृंगी मातेचे मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले | पुढारी

नाशिक : दिवाळीनिमित्त सप्तशृंगी मातेचे मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले

सप्तशुंगगड; पुढारी वृत्तसेवा : आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सवादरम्यान सालाबादप्रमाणे भाविकांची मोठा गर्दी होते. या पार्श्वभूमीवर विश्वत संस्थेने श्री भगवती- श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर २७ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनाच्या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी पायी पालख्या आणि भाविक मोठ्या प्रमाणात येतात. नवरात्र उत्सवात व मागील २ वर्षात कोविड परिस्थितीमुळे येवू न शकलेले भाविकांमुळे दिवाळीत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येण्यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच फ्युनीकुलर, रोप वे ट्रॉली सुविधा देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोडे यांनी केले आहे.

सप्तशृंगगडावरील देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी दि. 27 ऑक्टोबर ते दि. 13 नोव्हेंबरपर्यंत 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्टी निमित्त महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक येणार आहेत. या कालावधीत भाविकांना सुरळीत दर्शन व्हावे, यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त संस्थेने हा निर्णय घेतला आहे.

ॲड. दीपक पाटोदकर, विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट

हेही वाचलंत का ? 

Back to top button